तारा गिळण्याच्या प्रक्रियेवेळी सापडला नवा ब्लॅकहोल | पुढारी

तारा गिळण्याच्या प्रक्रियेवेळी सापडला नवा ब्लॅकहोल

कॅलिफोर्निया : ब्रह्मांडात अब्जावधी खगोलीय पिंड आहेत. अशातून ब्लॅकहोलसारख्या खगोलीय पिंडाला शोधणे अत्यंत अवघड काम असते. कारण ब्लॅकहोलमधून कसलाच प्रकाश उत्सर्जित होत नसतो. यामुळे मध्यम भारमान अथवा तारकीय भार असलेल्या ब्लॅकहोलला शोधणे जवळ जवळ अशक्यच असे समजले जाते. मात्र, सध्याच्या अत्याधुनिक आणि वेगवान स्पेस टेलिस्कोपमुळे हे आता शक्य होत आहे.

दीर्घ अंतरावर असलेल्या गॅलक्सीमधील तार्‍याला गिळणार्‍या प्रक्रियेतून लपलेल्या ब्लॅकहोलला शोधण्यात खगोल शास्त्रज्ञांना यश मिळाले आहे. यामुळे हा ब्लॅकहोल आणि गॅलक्सी यांच्यासंबंधीची माहिती मिळू शकेल, अशी अपेक्षा शास्त्रज्ञ करू लागले आहेत.

सुपरनोवा एक्स्पेरिमेेंट सर्व्हे करणार्‍या शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार एक तारा ब्लॅकहोलच्या अत्यंत जवळ आला होता. या तार्‍याचे टाईडल डिस्ट्रक्शन इव्हेंट नामक प्रक्रियेच्या माध्यमातून तुकडे तुकडे होत होते. या प्रक्रियेदरम्यान तार्‍याचे तुकडे होताना त्यातून प्रखर प्रकाश बाहेर पडत होता. यातूनच या गॅलक्सीमध्ये लपलेल्या या ब्लॅकहोलचा शोध लागला.

सांता क्रूज युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाचे खगोल शास्त्रज्ञ आणि सहायक प्रोफेसर व या संशोधनाचे प्रमुख लेखक रेयॉन फोले यांनी सांगितले की, पृथ्वीपासून प्रदीर्घ अंतरावर आकाशमालेत लपलेल्या स्थितीत असलेल्या या ब्लॅकहोलचा शोध हा उत्साह वाढवणारा शोध आहे. या ब्लॅकहोलच्या माध्यमातून ब्रह्मांडाच्या निर्मितीबद्दल माहिती मिळवण्यास मदत मिळणार आहे.

Back to top button