नॉर्वेमध्ये दिसला दुर्मीळ गुलाबी ऑरोरा | पुढारी

नॉर्वेमध्ये दिसला दुर्मीळ गुलाबी ऑरोरा

ओस्लो : पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राला सूर्यापासून आलेले सौरकण किंवा सौरवादळ धडकले की आकाशात रंगीबेरंगी प्रकाशझोत निर्माण होतात. त्यांना ‘ऑरोरा’ किंवा ‘नॉर्दन लाईटस्’ असे म्हटले जाते. नॉर्वे, कॅनडा, ग्रीनलँडसारख्या ध्रुवीय वर्तुळातील भागातील आसमंतात असा ऑरोरा दिसून येतो.

3 नोव्हेंबरलाही एक सौरवादळ पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राला धडकले. या चुंबकीय क्षेत्रात छेद करून भारीत कण पृथ्वीच्या वातावरणात शिरले आणि त्यांनी अनोखा गुलाबी रंगाचा ऑरोरा निर्माण केला. हे द़ृश्य अत्यंत दुर्मीळ असेच आहे. नॉर्वेच्या आसमंतात हे द़ृश्य पाहायला मिळाले.

एरव्ही जो ऑरोरा पाहायला मिळतो तो विविध रंगी असतो. मात्र, यावेळी तो पूर्णपणे गुलाबी रंगाचा पाहायला मिळाला. ग्रीनलँडर टूर कंपनीच्या एका टूर ग्रुपने हा दुर्मीळ ऑरोरा पाहिला व तो कॅमेर्‍यात टिपून घेता. मार्कस् वॅरिक नावाच्या नॉर्दन लाईटस् टूर गाईडच्या नेतृत्वाखाली हा चमू ऑरोरा पाहण्यासाठी नॉर्वेच्या ट्रोम्सोजवळील बेसवर गेला होता.

त्यावेळी स्थानिक वेळेनुसार सायंकाळी सहा वाजता आकाशात हा गुलाबी प्रकाश निर्माण झाला आणि तो दोन मिनिटे टिकला. तो अतिशय गडद गुलाबी रंगाचा होता असे वॅरिक याने सांगितले. अर्थातच वॅरिकबरोबर गेलेल्या पर्यटकांसाठी ही पर्वणीच ठरली. हा अत्यंत नेत्रदीपक असा नजारा त्यांना ‘याचि देही याचि डोळा’ पाहायला मिळाला.

Back to top button