

भोपाळ : कन्येचा जन्म झाल्याने अत्यानंदित झालेल्या पाणीपुरी विक्रेत्या पित्याने आपला आनंद अनोख्या पद्धतीने साजरा केला. भोपाळच्या कोलार परिसरातील या व्यक्तीने मुलीच्या जन्माच्या आनंदात 50 हजार पाणीपुरी लोकांना मोफत खाऊ घातली. त्यासाठी पाच तास दहा स्टॉल लावण्यात आले होते. लोकांनी रांगेत उभे राहून ही पाणीपुरी खाल्ली!
कोलार रोडवरील अंचल गुप्ता यांना 17 ऑगस्ट या दिवशी मुलगी झाली. त्यांना दोन वर्षांचा मुलगा आहे. आता जर मुलगी जन्मली तर तिच्या जन्माचा आनंद अनोख्या पद्धतीने साजरा करायचा असे त्यांनी आधीच ठरवले होते.
त्यामुळे मुलगी झाल्यावर त्यांनी तिचे नावही 'अनोखी' असेच ठेवले आहे. कन्याच जीवनात मोठा आनंद देते असा संदेशही त्यांना यामधून देण्याची इच्छा होती. त्यांची पत्नी व अन्य कुटुंबीयांनी त्यांना एक दिवस मोफत पाणीपुरी देण्याची कल्पना सूचवली.
त्याप्रमाणे त्यांनी मुलीच्या जन्माच्या आनंदात दहा स्टॉल लावून तब्बल 50 हजार पाणीपुरी लोकांना मोफत खाऊ घातली. रविवारी, 12 सप्टेंबरला त्यांनी दुपारी एक ते सायंकाळी सहापर्यंत सर्व ग्राहकांना मोफत पाणीपुरी दिली. त्यासाठी एक मोठा मंडपही घालण्यात आला होता. अंचल हे गेल्या चौदा वर्षांपासून कोलार येथे पाणीपुरी विकण्याचा व्यवसाय करीत आहेत.