गुणपत्रिकांतील चुकांचा विद्यार्थ्यांना मन:स्ताप | पुढारी

गुणपत्रिकांतील चुकांचा विद्यार्थ्यांना मन:स्ताप

कोल्हापूर : प्रवीण मस्के : यंदा दहावी, बारावीच्या परीक्षा न घेताच अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे गुणपत्रिकांचे वाटप करण्यात आले. मात्र, दोन्ही वर्षांच्या गुणपत्रिकांतील मोठ्या प्रमाणात चुका झाल्याने याचा पुढील प्रवेश प्रक्रियेवर परिणाम होत आहे. त्यामुळे ‘चूक शाळांची, भुर्दंड मात्र विद्यार्थ्यांना’ असे चित्र पाहायला मिळत आहे.

कोरोना संसर्गामुळे दहावी, बारावीची परीक्षा झालीच नाही. विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन करण्यात आले. त्यानुसार राज्य मंडळाकडून विद्यार्थ्यांना काही दिवसांपूर्वी गुणपत्रिकांचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आलेल्या गुणपत्रिकांमध्ये मुलगा, आई-वडील यांच्या नावासह जन्म तारखेमध्ये चुका आढळून आल्या आहेत.

यासंदर्भात कोल्हापूर विभागीय मंडळाने जानेवारीत शाळांना प्री-लिस्ट विद्यार्थी, पालक व जन्म तारखेच्या चुका दुरुस्त करून पाठविण्याबाबत कळविले होते. दहावी, बारावीची परीक्षा होतील, या आशेवर काही शाळा होत्या. मात्र, प्रत्यक्षात दोन्ही परीक्षा झाल्याच नाहीत. या काळात काही शाळांनी प्री-लिस्टकडे दुर्लक्ष केले. परीक्षा अर्ज भरताना विद्यार्थी व पालकांचे नाव, जन्म तारीख यामध्ये चुका केल्या.

दरम्यान, शाळांकडून विद्यार्थ्यांना दहावी, बारावीच्या गुणपत्रिकांचे वाटप झाले. गुणपत्रिकांचे वाटप झाल्यावर विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांमधील चुका लक्षात आल्या. कोल्हापूर विभागातील सुमारे एक हजारहून अधिक गुणपत्रिकांतील चुका झाल्याचे निदर्शनास आले आहे. विद्यार्थ्यांनी याबाबत तत्काळ शाळांशी संपर्क साधला.

अनेकांनी शाळांमार्फत बोर्डाकडे चुकांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव पाठविले. परंतु, अर्जांची संख्या पाहता त्यास विलंब लागत आहे. यामुळे पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज करताना अडचणी येत आहेत.

Back to top button