सोळा फूट मगरीच्या पोटात पाच हजार वर्षांपूर्वीची वस्तू | पुढारी

सोळा फूट मगरीच्या पोटात पाच हजार वर्षांपूर्वीची वस्तू

लंडन : अनेक प्राणी काहीबाही तोंडात टाकून ते गिळत असतात. त्याचा अर्थातच त्यांच्या आरोग्यावरही विपरित परिणाम होत असतो. आता सोळा फूट लांबीच्या एका मगरीच्या पोटात अतिशय खास वस्तू आढळली आहे.

या मगरीच्या पोटात शेन स्मिथ नावाच्या माणसाला एक बाण आणि एक प्लुमेट नावाचे हत्यार सापडले. हा बाण तब्बल पाच हजार वर्षांपूर्वीचा आहे हे विशेष. हा बाण आणि प्लेमेट अमेरिकेतील मूळ निवासी असलेल्या शिकार्‍यांकडून वापरलेला असावा असे तज्ज्ञांना वाटते.

शेन मृत प्राण्यांवर प्रक्रिया करण्याचे काम करतो. त्याच्या प्रोसेसिंग प्लँटने फेसबुकवर या मगरीचे फोटो शेअर केले आहेत. त्याला मगरीच्या पोटात माशांची हाडे, पक्ष्यांचे पंख आणि चेंडूही सापडले. त्याला ही मगर जॉन हॅमिल्टन नावाच्या माणसाने आणून दिली होती. अशा मृत प्राण्यांच्या शरीराच्या अवयवांपासून विविध प्रकारचे साहित्य बनवले जाते.

त्यासाठी त्यांच्या देहाची चिरफाड करण्याचे काम शेन स्मिथ करतो. या मगरीचे पोट फाडल्यावर आपल्याला अशी अनोखी आणि अत्यंत जुनी वस्तूही सापडेल याची त्याने कल्पना केली नव्हती. संशोधकांच्या मते, या मगरीच्या पोटातील बाण पाच ते सहा हजार वर्षांपूर्वीचा आहे.

Back to top button