कागल : वरद पाटील हत्या प्रकरणी सीबीआयची मदत | पुढारी

कागल : वरद पाटील हत्या प्रकरणी सीबीआयची मदत

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : सोनाळी (ता. कागल) येथील वरद पाटील या बालकाच्या हत्या प्रकरणाला महिना होऊनही त्याच्या हत्येचे नेमके कारण अजूनही स्पष्ट झालेले नाही. वरद हत्या प्रकरणी हत्येमागे दडलेल्या कारणांचा छडा लावण्यासाठी तपास यंत्रणेने ‘सीबीआय’ ची मदत घेतली आहे.

वेगवेगळी माहिती देऊन तपास यंत्रणांची

दिशाभूल करणार्‍या संशयित आरोपी दत्तात्रय ऊर्फ मारुती तुकाराम वैद्य (रा. सोनाळी) याची आज नवी मुंबई (बेलापूर) येथील सीबीआय अंतर्गत न्यायवैद्यक प्रयोगशाळेत लाय डिटेक्टर, ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्ट होणार आहे.

सात वर्षीय वरद रवींद्र पाटील याची अमानुष हत्या नरबळी की अन्य कोणत्या कारणातून झाली, यावर वेगवेगळे प्रवाह असले तरी तपास यंत्रणेने नरबळीचा स्पष्ट इन्कार केला आहे. त्यामुळे खुनामागे दडलेल्या कारणाचे गूढ वाढले आहे.

टप्प्याटप्प्याने टेस्ट होणार

लाय डिटेक्टर, ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्टसाठी संशयिताने स्वत: न्यायालयात संमती दिल्याने दत्तात्रय वैद्यसमवेत विशेष तपास पथक सोमवारी पहाटे नवी मुंबई, बेलापूर येथे दाखल झाले आहे. सकाळी त्याची वैद्यकीय तपासणीही झाली. मंगळवारी सकाळी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत टप्प्याटप्प्याने विविध टेस्ट होणार आहेत, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.

पोलिसांनी काही तासांत मारेकर्‍याचा छडा लावून त्याला बेड्या ठोकल्या होत्या. संशयिताने खुनाची कबुली दिली. मात्र वरद हत्या प्रकरणी खुनाचे कारण अजूनही गुलदस्त्यात आहे. मारेकर्‍याच्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेत विविध तपासण्या होत असल्याने चौकशीत निष्पन्न होणार्‍या माहितीकडे तपास यंत्रणांसह पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. कोणाच्या चिथावणीवरून तरी माथेफिरूने अमानुष कृत्य केले असावे का, याचाही पोलिस शोध घेत आहेत. नार्को टेस्टमधून त्याचा उलगडा होणार का, याकडेही वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांचे लक्ष लागले आहे.

Back to top button