आयसीएमआर आणि आयआयटी मुंबईला ड्रोन वापरण्यास परवानगी | पुढारी

आयसीएमआर आणि आयआयटी मुंबईला ड्रोन वापरण्यास परवानगी

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : नागरी उड्डाण मंत्रालय आणि नागरी उड्डाण महासंचालनालयाने (डीजीसीए)) इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबई (आयआयटी-मुंबई) यांना ड्रोन वापरण्यास परवानगी दिली आहे.

या परवानगीमध्ये आयसीएमआरला ड्रोनचा वापर करून ३ हजार मीटर उंचीपर्यंत अंदमान आणि निकोबार बेटे, मणिपूर आणि नागालँडमध्ये प्रायोगिक कार्यकक्षेबाहेरील (बीव्हीएलओएस) लस वितरण करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. तर आयआयटी मुंबईला स्वतःच्या परिसरात ड्रोनचे संशोधन, विकास आणि चाचणीसाठी ड्रोन वापरण्याची परवानगी मिळाली आहे.

डीजीसीएने दिलेल्या माहितीनुसार, ड्रोन वापरण्याची सूट हवाईपट्टी वापराच्या अटी आणि शर्तींच्या अधीन असेल. तसेच त्या-त्या हवाईपट्टी वापराच्या मंजुरीच्या तारखेपासून एक वर्षाच्या कालावधीसाठी किंवा पुढील आदेशापर्यंत, जे आधी असेल त्यानुसार वैध असेल.

याआधी ११ सप्टेंबर २०२१रोजी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी तेलंगणा राज्यातील विकराबाद येथे अशा प्रकारे पहिल्या ‘मेडिसिन फ्रॉम द स्काय’ अर्थात हवाईमार्गे औषध प्रकल्पाची सुरुवात केली होती. त्यात ड्रोन वापरून औषधे आणि लसींचा पुरवठा करणे शक्य झाले होते. २५ ऑगस्ट २०२१ रोजी नागरी उड्डाण मंत्रालयाने ड्रोन नियम, २०२१ मध्ये सूट दिल्याचे अधिसूचित केले. त्यामुळे ड्रोनचा वापर करण्यास मिळणाऱ्या परवानग्या सुलभ झाल्या आहेत.

Back to top button