पावसाचा जोर; कृष्णा-वारणा पातळी वाढली | पुढारी

पावसाचा जोर; कृष्णा-वारणा पातळी वाढली

सांगली/पाटण : पुढारी वृत्तसेवा : सांगलीसह पश्चिम भागात सोमवारी दिवसभर पावसाच्या सरी पडत होत्या. शिराळा व वाळवा तालुक्यांत पाऊस सुरू आहे. दरम्यान, गेल्या तीन-चार दिवसांपासून कोयना आणि चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. परिणामी कृष्णा-वारणा नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे.

सोमवारी वारणा नदी अनेक भागात पात्राबाहेर पडली आहे. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. सांगलीत आयर्विन पुलाजवळ कृष्णेची पाणी पातळी सोमवारी सायंकाळी 12 फूट होती. मंगळवार दुपारपर्यंत ती 25 फुटांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कोयना, चांदोली धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. पाणीसाठा नियत्रंणात ठेवण्यासाठी कोयना धरणातून सोमवारी रात्रीपासून 50 हजार 372 आणि चांदोलीतून 8 हजार 205 क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे. परिणामी कृष्णा-वारणा नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. कर्नाटकातील अलमट्टीतून 55 हजार 553 क्युसेक विसर्ग सुरू आहे.

चांदोली धरणात 34.35 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. विविध धरणातील पाणीसाठा टीएमसीमध्ये असा ः कोयना- 104.49, धोम- 12.41, कण्हेर- 9.70, अलमट्टी 122.048 (123).

शिराळा तालुक्यात 22.6 मि.मी. पाऊस

जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 4.3 मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. शिराळा तालुक्यात सर्वांधिक 22.6 मि.मी. पाऊस पडला आहे.

जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि. मी. मध्ये अशी ः मिरज- 1.6, जत- 0.3, खानापूर- विटा- 2.2, वाळवा- इस्लामपूर- 3.9, तासगाव- 0.8, शिराळा- 22.6, आटपाडी- 1.0, कवठेमहांकाळ- 0.4, पलूस- 1.8, कडेगाव- 7.4.

वारणावती/कोकरूड : चांदोली धरण परिसरामध्ये गेल्या आठ ते दहा दिवसांंपासून पावसाची संततधार कायम आहे. गेल्या 24 तासात 37 मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. चांदोली धरणात 34.36 टीएमसी साठा झाला आहे. म्हणज शंभर टक्के धरण भरले आहे.

वारणा नदी या वर्षी तिसर्‍यांदा पात्राबाहेर पडली आहे. कोकरूड-रेठरे व शिराळे खुर्द-माणगाव हे दोन बंधारे पाण्याखाली गेल्याने काही गावांचा संपर्क तुटला आहे. पावसाचे प्रमाण वाढल्यास विसर्ग आणखी वाढविण्यात येणार आहे, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कोयना धरणाचे दरवाजे पाच फूट तीन इंचांवर

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने धरणात प्रतिसेकंद 42 हजार 502 क्युसेक पाण्याची आवक होऊ लागली आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा 104.92 टीएमसी इतका झाला आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी केवळ 0.33 टीएमसी पाणी आवश्यक असल्याने धरणाचे सहा वक्री दरवाजे 5 फूट 3 इंचांनी उचलण्यात आले आहेत.

कोयना धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता 105.25 टीएमसी इतकी आहे. त्यामुळे आता धरणात केवळ 0.33 टीएमसी इतकेच पाणी सामावून घेतले जाऊ शकते. त्यामुळे धरणात येणारे सर्व पाणी कोयना नदीत सोडण्याचा निर्णय कोयना धरण व्यवस्थापनाने घेतला आहे.

Back to top button