अँटिबॉडी कमी असलेल्यांनाच बूस्टर डोस | पुढारी

अँटिबॉडी कमी असलेल्यांनाच बूस्टर डोस

नवी दिल्ली ; जाल खंबाटा : कोरोना प्रतिबंधक लसीकरण अभियानात केंद्र सरकार जागतिक आरोग्य संघटनेची नियमावलीनुसार अंमलबजावणी करीत असून, बूस्टर डोसबाबत अद्याप केंद्र सरकारने काही निर्णय घेतलेला नाही. तथापि, ज्यांच्यात अँटिबॉडींजची पातळी कमी आहे, अशांनाच तिसरा डोस म्हणजे बूस्टर डोस देण्याबाबत भारतीय तज्ज्ञ जोर देत आहेत.

भुवनेश्वरमधील इन्स्टिट्यूट ऑफ लाईफ सायन्सचे (आयएलएस) संचालक डॉ. अजय परिदा म्हणाले की, देशात लसीकरण झालेल्यांपैकी 20 टक्के लोकसंख्येमध्ये ‘सार्स कोव्ह-2’ या विषाणूविरोधात अँटिबॉडी विकसित झालेली नाही. अशा लोकांनाच तिसर्‍या डोसची म्हणजेच बूस्टर डोसची गरज असेल.

आयएलएसच्या 25 टक्के फॅकल्टी सदस्यांमध्ये अँटिबॉडी निगेटिव्ह असल्याचे ताज्या संशोधनातून समोर आले. लसीकरणानंतर चौथ्या ते सहाव्या महिन्यांपर्यंतच्या काळात अँटिबॉडीजची पातळी कमी झाल्याचे दिसून आले. अनेकांमध्ये अँटिबॉडींजची ही संख्या 50 च्याही खाली आहे. अँटिबॉडींजची संख्या 60 ते 100 असणे म्हणजे ती व्यक्ती अँटिबॉडी पॉझिटिव्ह असणे.

म्हणजेच त्याच्यात पुरेशा अँटिबॉडीज आहेत, असे समजले जाते. कोव्हिशिल्डची परिणामकारकता 70 टक्के आहे तर कोव्हॅक्सिनची 80 टक्के. म्हणजेच लसीकरण झालेल्या 20 ते 30 टक्के लोकांमध्ये अँटिबॉडीज विकसित झालेल्या असतीलच असे नाही. याबाबतचा वैद्यकीय अभ्यास अंतिम टप्प्यात असून, त्यावरच बूस्टर डोसची मान्यता ठरू शकेल.

देशात दिवसात 27 हजार 254 बाधित

नवी दिल्ली : कोरोना तपासण्यांचे प्रमाण कमी होताच कोरोनाबाधितांची संख्या कमी झाली आहे. गेल्या 24 तासांत 27 हजार 254 कोरोनाबाधितांची भर पडली. तर, 37 हजार 687 रुग्णांनी कोरोनावर मात केली. 219 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला. रविवारी एकट्या केरळमध्ये 20 हजारांहून अधिक कोरोनाबाधित आढळले, तर 67 मृत्यू झाले. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 3 कोटी 32 लाख 64 हजार 175 पर्यंत पोहोचली आहे. यातील 3 कोटी 24 लाख 47 हजार 32 रुग्णांनी कोरोनावर मात केली. तर, 4 लाख 42 हजार 874 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 3 लाख 74 हजार 269 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

राज्यात कोरोना रुग्ण संख्येत घट

मुंबई : राज्यात सोमवारी 2 हजार 740 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर, 3 हजार 233 रुग्णांना घरी सोडले. आजवर 65 लाख 1 हजार कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, त्यापैकी 63 लाख 9 हजार जणांनी कोरोनावर मात केली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.05 टक्के आहे. सोमवारी 27 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. सध्या 50 हजार सक्रिय रुग्ण आहेत. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के आहे.

Back to top button