एकच प्युरिफायर करतो शहरातील संपूर्ण हवा स्वच्छ | पुढारी

एकच प्युरिफायर करतो शहरातील संपूर्ण हवा स्वच्छ

बीजिंग : भारतासह जगात बहुतेक देशांत हवेचे वाढते प्रदूषण ही एक मोठी समस्या बनली आहे. याचे मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. हवेचे सर्वाधिक प्रदूषण चीनमध्ये होते, असे म्हटले जाते. मात्र, ही समस्या निकालात काढण्यासाठी चीनने अंमलात आणलेले उपाय सध्या चांगलेच उपयोगी ठरत असल्याचे दिसत आहे.

चीनने पाच वर्षांपूर्वी असा एक एअर प्युरिफायर बनवला की तो तब्बल 330 फूट उंच होता. ज्यावेळी या एअर प्युरिफायरचे पंखे फिरू लागतात, तेव्हा शहरातील संपूर्ण हवा शुद्ध बनू लागते. लोकांना हवेच्या प्रदूषणापासून वाचविणारा हा टॉवर चीनच्या शांक्सी प्रांतातील ‘झियान’ नामक शहरात उभारण्यात आला आहे.

काही वर्षांपूर्वी शांक्सी प्रांतातील ‘झियान’ शहर हे हवेच्या वाढत्या प्रदूषणामुळे त्रस्त बनले होते. मात्र, सध्या जगातील सर्वात मोठा एअर प्युरिफायरमुळे शहरातील संपूर्ण प्रदूषित हवा स्वच्छ होते. यामुळे या शहरातील लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

झियान शहरात उभारण्यात आलेल्या या एअर प्युरिफायरमध्ये शहरातील संपूर्ण हवा स्वच्छ करण्याची क्षमता आहे. हे प्युरिफायर दिवसाला एक कोटी घनमीटर हवेला स्वच्छ करते. यामुळे शहरातील हवेचा दर्जा सुधारण्यास मदत मिळत आहे. तसेच स्वच्छ हवेमुळे लोकांचा अनेक आजारांपासून बचावही होत आहे. उल्लेखनीय म्हणजे हे एअर प्युरिफायर आपल्या भोवतीच्या 10 किमी क्षेत्रातील हवा स्वच्छ करू शकते, इतकी जास्त त्याची क्षमता आहे.

Back to top button