लालग्रह बनला असता मानवाचे दुसरे घर; पण… | पुढारी

लालग्रह बनला असता मानवाचे दुसरे घर; पण...

वॉशिंग्टन : मंगळावर मानवी वस्ती स्थापन करण्याचे स्वप्न खगोलशास्त्रज्ञ पाहत आहेत. यासंदर्भात करण्यात आलेल्या नव्या संशोधनातील निष्कर्षानुसार जलवायू परिवर्तनामुळे बरबाद होण्यापूर्वी म्हणजे प्राचीन मंगळ हा मानवासाठी राहण्यायोग्य होता.

‘नेचर अ‍ॅस्ट्रॉनॉमी’ नामक जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार या संशोधनासाठी जलवायू मॉडेलिंग स्टडीचा आधार घेण्यात आला. यामध्ये अब्जावधी वर्षांपूर्वी मंगळावर राहणार्‍या सूक्ष्म जीवांचा अभ्यास करण्यात आला. त्यावेळी पृथ्वीप्रमाणेच लालग्रहाची स्थिती होती. मात्र, जलवायू परिवर्तनामुळे हा ग्रह ओसाड बनला.

पृथ्वीवर जीवनाची निर्मिती होण्यास मुख्यत्वे दोन कारणे जबाबदार आहेत. ही कारणे म्हणजे पृथ्वीवर असलेले वायू आणि सूर्यापासूनचे योग्य अंतर होय; पण याच दोन कारणांमुळे मंगळावरील कथित जीवन नष्ट झाले असल्याची शक्यता आहे, असे शास्त्रज्ञांना वाटते. दरम्यान, डेली स्टारने दिलेल्या माहितीनुसार प्राचीन काळी मंगळावर असलेल्या सूक्ष्म जीवांनी हायड्रोजनचा उपयोग करत मिथेनची निर्मिती केली. याशिवाय त्या सूक्ष्म जीवांनी उष्णतेपासून मंगळाची सुरक्षा करणारे तंत्रच खाऊन टाकले.

काळानुसार मंगळाचे तापमान इतके थंड झाले की, हा ग्रहच निर्जन बनून गेला. ज्यावेळी तेथे सूक्ष्म जीव अस्तित्वात होते, त्यावेळी मंगळाचे तापमान 10 ते 20 अंश सेल्सिअस इतके होते. मात्र, सूक्ष्म जीवांची संख्या वाढत गेली आणि तापमान उणे 57 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले. यामुळे या सूक्ष्म जीवांना मंगळाच्या खोल भागात जेथे उष्ण तापमान होते, तेथे धाव घ्यावी लागली.

Back to top button