तब्बल 400 व्हेल माशांचा किनार्‍यावर येऊन मृत्यू! | पुढारी

तब्बल 400 व्हेल माशांचा किनार्‍यावर येऊन मृत्यू!

वेलिंग्टन : ‘व्हेल बीचिंग’ ही सागरी विज्ञानातील सर्वात रहस्यमय घटना आहे, जी सागरी जीवशास्त्रज्ञ अद्याप समजू शकलेले नाहीत. काही शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, किनार्‍याच्या खूप जवळ आल्याने व्हेल मासे अडकतात व त्यानंतर त्यांना पाण्यात परतणे कठीण होते. न्यूझीलंडमधील समुद्र किनार्‍यावरही अशीच विचित्र घटना घडली आहे. गेल्या आठवडाभरात येथे 400 हून अधिक व्हेल माशांचा किनार्‍यावर अडकून मृत्यू झाला आहे. न्यूझीलंडच्या पिट बेटावर 240 पायलट व्हेल मृत झाल्याची माहिती पुढे आली आहे. हे व्हेल मासे समुद्राच्या किनार्‍यावर अडकले होते.

चॅरिटी प्रोजेक्ट ‘जोनाह’चे सरव्यवस्थापक डॅरेन ग्रोव्हर यांनी सांगितले की, या भागात व्हेल माशांना पाण्यात पुन्हा सोडण्यासाठी त्यांच्याकडे पुरेशी मदत नव्हती. तसेच मदतीसाठी लागणारे पुरेसे लोक नव्हते. चथम बेटावरही 215 व्हेल आढळले होते. 400 पेक्षा जास्त पायलट व्हेल मरण पावले आहेत, असे येथील अधिकार्‍यांनी सांगितले. अडकलेल्या कोणत्याही व्हेलला पुन्हा ‘फ्लोट’ करता आले नाही आणि सर्व मरण पावले.

न्यूझीलंडच्या दक्षिण बेटाच्या पूर्व किनार्‍यापासून सुमारे 840 कि.मी. अंतरावर पिट आणि चथम बेटे ही समूहातील सर्वात मोठी बेटे आहेत. या मोठ्या चथम बेटावर सुमारे 800 लोक राहतात आणि पिट बेटावर 40 लोक राहतात. मोठ्या आकाराचे मासे किनार्‍यावर कसे अडकतात याचा शोध शास्त्रज्ञांना अद्याप सापडलेला नाही.’

Back to top button