स्टोनहेंजपेक्षाही जुन्या रचनेचा शोध | पुढारी

स्टोनहेंजपेक्षाही जुन्या रचनेचा शोध

प्राग : पुरातत्त्व संशोधकांनी झेक प्रजासत्ताकची राजधानी प्रागमध्ये केलेल्या उत्खननात पाषाणयुगातील एक रचना आढळून आली आहे. ही मानवनिर्मित रचना इंग्लंडमधील स्टोनहेंज व इजिप्तमधील पिरॅमिडपेक्षाही जुनी आहे. सुमारे सात हजार वर्षांपूर्वीची ही रचना निओलिथिक काळाच्या किंवा नव्या पाषाणयुगाच्या अखेरच्या टप्प्यातील आहे.

या गोलाकार इमारतीमध्ये स्थानिक शेतकरी समुदाय एकत्र येत असावा, असे संशोधकांना वाटते. अर्थात, या रचनेच्या उद्देशाबाबत ठोस संशोधन झालेले नाही. ही गोलाकार रचना अतिशय भव्य आहे. तिचा व्यास 180 फूट किंवा 55 मीटर इतका आहे. पिसाचा झुकता मनोरा जितक्या उंचीचा आहे तितकी त्याची लांबी आहे, असे म्हटले तरी चालेल. ही रचना निर्माण करणार्‍या लोकांविषयी आताच काही सांगणे घाईचे ठरेल, असे संशोधकांनी म्हटले आहे.

इसवीसन पूर्व 4900 ते इसवीसन पूर्व 4400 या काळातील हा मानव समुदाय होता. त्यांनी नेमक्या कोणत्या उद्देशासाठी ही इमारत बांधली हे स्पष्ट झालेले नाही. विनोर जिल्ह्यातील उत्खननात ही रचना समोर आली. 1980 च्या दशकात काही कामगार गॅस आणि पाण्याच्या पाईपलाईनचे काम करीत असताना ही रचना सर्वप्रथम समोर आली होती व त्यावेळेपासून तिथे वैज्ञानिकद़ृष्ट्या संशोधन सुरू होते.

आता नव्या उत्खननात ही रचना संपूर्णपणे उघड झाली आहे. तिथे काही मातीच्या भांड्यांचे अवशेष, दगडी अवजारे व प्राण्यांची हाडेही सापडली आहेत.

Back to top button