पाण्याबाहेरही जिवंत राहू आणि चालू शकणारा सागरी जलचर | पुढारी

पाण्याबाहेरही जिवंत राहू आणि चालू शकणारा सागरी जलचर

नवी दिल्ली : पृथ्वीतलावर कोट्यवधी जीवांचे अस्तित्व आहे. यातील प्रत्येक जीवाला जगण्यासाठी निसर्गाने काही तरी हमखास विशेष देणगी दिली आहे. यासंदर्भात करण्यात आलेल्या एका नव्या संशोधनात शास्त्रज्ञांनी शार्कच्या एका नव्या प्रजातीचा शोध लावल्याचा दावा केला आहे. हा जलचर पाण्याबाहेर येऊन आरामात सुमारे दोन तास राहू व चालूही शकतो.

‘डेली स्टार वेबसाईट’च्या अहवालानुसार फ्लोरिडा अटलांटिक युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी अत्यंत आश्‍चर्य वाटणार्‍या गोष्टीचा शोध लावला. यासंदर्भात देण्यात आलेल्या माहितीनुसार शास्त्रज्ञांनी ‘एपाऊलेट शार्क’ माशाच्या प्रजातीचा शोध लावला आहे. हे मासे पाण्याबाहेर पडून आपल्या पंखासारखे दिसणार्‍या फिनच्या मदतीने अलगद चालू शकतात. उल्लेखनीय म्हणजे हे मासे ऑक्सिजनविना पाण्याबाहेर सुमारे दोन तासांपर्यंत जिवंत राहू शकतात. मात्र, अशा सर्व गोष्टी पर्यावरणातील परिवर्तनामुळे होत असल्याचा संशोधकांचा दावा आहे.

माशांमध्ये चालण्याचे कौशल्य कसे विकसित होत आहे? तसेच ते कशामुळे होत आहे? याबाबत शास्त्रज्ञ संशोधन करत असताना चालणार्‍या आणि पाण्याबाहेरही जिवंत राहू शकणार्‍या या शार्कच्या प्रजातीचा शोध लागला. चालणार्‍या शार्कच्या प्रजाती प्रामुख्याने ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया आणि न्यू पापुआ गिनी येथे आढळतात. असे असले तरी ‘एपाऊलेट’ या चालणार्‍या शार्कबाबत अजूनही संशोधन करण्याची गरज असल्याचे शास्त्रज्ञांचे मत आहे.

Back to top button