वाळवंट संपते आणि सुरू होतो महासागर! | पुढारी

वाळवंट संपते आणि सुरू होतो महासागर!

लंडन : या पृथ्वीतलावर निसर्गाचे अनेक अनोखे आविष्कार पाहायला मिळत असतात. आफ्रिकेतील एक वाळवंटही असेच अनोखे आहे. हे वाळवंट एका ठिकाणी संपते आणि तिथूनच महासागर सुरू होतो. नामिबियाचे हे वाळवंट अन्यही अनेक कारणांसाठी वैशिष्ट्यपूर्ण ठरलेले आहे.

हे ठिकाण असे आहे जिथे जणू काही अटलांटिक महासागर स्वतःच वाळवंटाच्या भेटीला येतो. नैऋत्य आफ्रिकेच्या अटलांटिक तटाला लागून असलेल्या या कोरड्या, वालुकामय प्रदेशाला ‘नामीब वाळवंट’ असे म्हटले जाते. ‘नामीब’ म्हणजे ‘जिथे काहीही नाही’! हे वाळवंट तब्बल 5 कोटी 50 लाख वर्षे जुने असल्याचे सांगितले जाते. त्या तुलनेत जगातील सर्वात मोठे वाळवंट ‘सहारा’ वयाने लहान आहे. सहारा वाळवंट हे केवळ 20 ते 70 लाख वर्षे जुने आहे.

दक्षिण अंगोलापासून 2 हजार किलोमीटर दूर दक्षिण आफ्रिकेपर्यंत हे नामीब वाळवंट पसरलेले आहे. हा परिसर म्हणजे आश्चर्यकारक घटनांचे भांडारच आहे. मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागासारखा दिसणारा हा प्रदेश तीन देशांमधील 81 हजार चौरस किलोमीटर भागात पसरलेला आहे. दिवसा इथे 45 अंश सेल्सिअस इतके तापमान असते तर रात्री गोठवून टाकणारी थंडी असते. त्यामुळे हा भाग मनुष्याने राहण्यास खडतर असाच आहे.

संबंधित बातम्या

या वाळवंटात अटलांटिक किनार्‍यावर एक 500 किलोमीटरचा परिसर आहे. त्याचे नाव ‘नरकाचा दरवाजा’ असे आहे. वाळूचे डोंगर, हजारो जहाजांचे गंजलेले अवशेष आणि व्हेल माशाचे सांगाडे असे द़ृश्य याठिकाणी दिसते. या परिसरात दाट धुके असते. एकीकडून अटलांटिकची थंडी आणि दुसरीकडून नामिबचे उष्ण वारे यांच्या एकत्र येण्याने हे धुके बनते. या वाळवंटात ‘पर्‍यांचे रिंगण’ नावाची एक रहस्यमय जागा आहे. तिथे जागोजागी दीड ते 6 मीटर आकाराची वर्तुळे दिसतात.

Back to top button