जपानमध्ये चॉपस्टिकचे आहेत ‘असे’ही नियम | पुढारी

जपानमध्ये चॉपस्टिकचे आहेत ‘असे’ही नियम

टोकियो : खाण्या-पिण्याचे पदार्थ हे नेहमीच केवळ ‘उदरभरणा’साठी नसतात. त्यामागे काही अन्यही प्रकारचे महत्त्व असू शकते. चीन-जपानमध्ये चहा हे केवळ एक पेय नसून त्यामागे काही सांस्कृतिक वारसा आणि विधीही असतात. जपानमध्ये ‘चॉपस्टिक’ नामक दोन काड्यांनी घास घेतला जात असतो. या काड्यांनाही असेच सांस्कृतिक व धार्मिक महत्त्व आहे. या काड्या वापरण्याचेही काही नियम आहेत.

जपानमध्ये ‘हाशी’ नावाने ओळखल्या जाणार्‍या चॉपस्टिक म्हणजे सुमारे 25 सेंटीमीटर लांबीच्या लाकडाच्या काड्या असतात. जेवणाच्या टेबलावर या चॉपस्टिकचा वापर योग्य पद्धतीनेच करावा लागतो, नाही तर त्यामुळे भलतेच गैरसमज होऊ शकतात. जपानी समाजात आहाराची वेळ अतिशय महत्त्वाची असते. त्यामुळे चॉपस्टिक कशा धराव्यात, त्यांचा वापर कधी व कसा करावा हे आधी समजून घ्यावे लागते. चॉपस्टिकचा वापर करण्याच्या 40 पद्धती अशा आहेत ज्या टाळणे गरजेचे असते नाही तर समोरची व्यक्ती नाराज होऊ शकते. ‘तातेबाशी’ भाताच्या बाऊलमध्ये चॉपस्टिक सरळ उभी ठेवणे चुकीचे ठरते.

ही पद्धत अंत्ययात्रेवेळी वापरली जात असते. त्याचप्रमाणे ‘आवसेबाशी’ म्हणजेच जेवणाला चॉपस्टिकच्या एका जोडीबरोबरच अन्य व्यक्तीने वापरलेल्या चॉपस्टिकसह वापरणे. ही पद्धतही अंत्यसंस्कारावेळी वापरली जात असते. ‘आगेबाशी’ म्हणजे आपल्या चॉपस्टिकला तोंडाच्या उंचीपेक्षाही वर नेणे चुकीचे मानले जाते. ‘उकेबाशी’ म्हणजे चॉपस्टिकला धरून दुसर्‍यांदा घेण्यासाठी बाऊल पुढे घेणे. ‘ओतोशीबाशी’ म्हणजे चॉपस्टिक खाली पाडणे आणि ‘ओशिकामिबाशी’ म्हणजे भांड्यातून अन्न घेऊन थेट तोंडात टाकणे.

अशा काही गोष्टी जेवणाच्या वेळी टाळाव्या लागतात, नाही तर यजमान किंवा पाहुणे नाराज होऊ शकतात. चॉपस्टिकचा वापर चीनमध्ये सुमारे तीन हजार वर्षांपूर्वी शिया राजवंशाच्या काळात सुरू झाला. त्यानंतर पूर्व आशियातही चॉपस्टिकचा वापर होऊ लागला. जगात सध्या तीनप्रकारे जेवण घेतले जाते. एक म्हणजे आपल्यासारखे थेट हाताने, दुसरे चमचा किंवा सुरी-काट्याने व तिसरे चॉपस्टिकने.

Back to top button