पत्त्यांमधील एका राजाला का नसते मिशी? | पुढारी

पत्त्यांमधील एका राजाला का नसते मिशी?

नवी दिल्ली :  सुट्टीत वेळ घालवण्यासाठी पत्ते खेळणे हा अनेकांच्या बालपणीचा कार्यक्रम असतो. विशेषतः बाहेर ऊन रणरणत असले की दुपारच्या वेळी घरात असे बैठी खेळ खेळले जात असतात. सध्याच्या मोबाईल गेम्सच्या काळातही पत्त्यांची लोकप्रियता अबाधित आहे. 52 पत्त्यांची अनेक वेगळी वैशिष्ट्येही आपल्याला जाणवत असतात. यापैकी एका राजाला बिनमिशांचाच दाखवलेला असतो, त्याचे कारण माहिती आहे का?

52 पत्त्यांच्या कॅटमध्ये इस्पिक, किल्वर, बदाम आणि चौकट या चिन्हांची प्रत्येकी 13 पानं असतात. या सर्वांमध्ये एक राजा असतो. मात्र, या चार राजांपैकी तिघांना मिशा आहेत आणि एकाला मिशी नाही. त्याचे कारण अतिशय रंजक आहे. असे म्हणतात की सुरुवातीला या सर्व राजांना मिशा होत्या; पण ज्यावेळी हे पत्ते पुन्हा डिझाईन करण्यात आले त्यावेळी ते ‘किंग ऑफ हार्ट’ म्हणजेच लाल बदामाच्या राजाला मिशा काढणे विसरले गेले.

विशेष म्हणजे यानंतरही ही चूक सुधारली गेली नाही. त्यावेळेपासून लाल बदामाच्या पानाचा राजा बिनमिशीचाच आहे. आता ती चूक न सुधारण्याचेही कारण दिले जाते. ते असे की ‘किंग ऑफ हार्ट’ हा फ्रेंच राजा शार्लेमेनच्या प्रतिमेचा आहे. हा राजा अत्यंत देखणा आणि प्रसिद्ध होता. त्याने वेगळे दिसण्याच्या इच्छेने आपल्या मिशा कापल्या होत्या. त्याचीच प्रतिमा असल्याने या लाल बदामाच्या राजाला मिशा दाखवत नाहीत, असे म्हटले जाते.

Back to top button