जगभरात तापमानवाढीने मोडले उच्चांक! | पुढारी

जगभरात तापमानवाढीने मोडले उच्चांक!

वॉशिंग्टन : अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने आशिया, युरोप, उत्तर आफ्रिका आणि पश्चिम आशियामधील भीषण उष्णतेबाबत सावध केले आहे. या सर्व ठिकाणी तापमान 40 अंशांच्या पुढे गेले असून अनेक ठिकाणी तापमानवाढीने जुने उच्चांक मोडले आहेत. अगदी इंग्लंडमध्येही सध्या तापमानाने चाळीशी पार केली असून लोक भीषण उकाड्याने हैराण झाले आहेत.

‘नासा’ने 13 जुलैच्या या छायाचित्रात दाखवले आहे की कशाप्रकारे पूर्व गोलार्धातील तापमान आहे. या प्रतिमेत आपली निळी पृथ्वी भीषण उष्णतेमुळे लाल दिसून येत आहे. उत्तर भारतातील तापमानवाढही यामधून दिसून येते. ‘नासा’च्या नकाशात उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान आणि मध्य प्रदेशातील काही भागात भीषण उकाडा असल्याचे दिसते.

‘नासा’च्या गोड्डार्ड स्पेस फ्लाईट सेंटरचे स्टीवन पावसोन यांनी सांगितले की वेगवेगळ्या ठिकाणी शीतलतेचा निळा रंग जाऊन तिथे भीषण उष्णतेचा लाल रंग दिसत आहे. पृथ्वीचा विशाल भाग आता उष्णतेच्या विळख्यात अडकला आहे. याचा स्पष्ट अर्थ असा होतो की ग्रीन हाऊस वायूंच्या उत्सर्जनामुळे ऋतुमानातही धोकादायक बदल झाला आहे व त्याचा परिणाम आपल्या दैनंदिन जीवनावरही पडत आहे.

पश्चिम युरोपमध्ये आधीच दुष्काळ होता व आता तिथे भयानक उष्णतेने वणव्यांची भर पडली आहे. पोर्तुगाल, स्पेन आणि फ्रान्सच्या काही भागाला त्याचा फटका बसला आहे. पोर्तुगालमध्ये 13 जुलैला तापमान चक्क 45 अंश सेल्सिअसपर्यंत गेले. तिथे वणव्यांमुळे 3 हजार हेक्टरचा परिसर जळून खाक झाला आहे. उत्तर आफ्रिकेत ट्युनिशियाची राजधानी ट्यूनिसमध्ये पारा 48 अंश सेल्सिअसवर गेला आहे.

Back to top button