पुढच्या वर्षीच लोकसंख्येत भारत चीनच्या पुढे? | पुढारी

पुढच्या वर्षीच लोकसंख्येत भारत चीनच्या पुढे?

वॉशिंग्टन : सध्या चीन हा देश लोकसंख्येच्या बाबतीत जगात अव्वल क्रमांकावर आहे. याबाबत भारत दुसर्‍या क्रमांकावर आहे. मात्र, पुढील वर्षी म्हणजेच 2023 मध्येच भारत लोकसंख्येबाबत चीनला मागे टाकेल असे संयुक्त राष्ट्रांच्या एका अहवालात म्हटले आहे.

सध्या चीनची लोकसंख्या 1.426 अब्ज आहे तर भारताची लोकसंख्या 1.412 अब्ज आहे. 2023 मध्ये भारताची लोकसंख्या वाढून ती 1.429 अब्ज होऊ शकेल. तसेच 2050 पर्यंत हा आकडा 1.688 अब्जापर्यंत पोहोचू शकतो. शतकाच्या मध्यास चीनच्या लोकसंख्येत घट झालेली दिसून येऊ शकते. तेथील लोकसंख्या 1.317 अब्ज होऊ शकेल. संयुक्त राष्ट्रांच्या अनुमानानुसार संपूर्ण विश्वाची लोकसंख्या 15 नोव्हेंबर 2022 ला 8 अब्जाचा आकडा गाठू शकते. 1950 नंतर जगाची लोकसंख्या सर्वात कमी दराने वाढत आहे ही यामधील दिलासादायक गोष्ट आहे.

एका रिपोर्टनुसार 2020 मध्ये लोकसंख्यावाढीच्या दरात एक टक्क्याने घट आली आहे. ताज्या अनुमानानुसार 2030 पर्यंत जगाची लोकसंख्या 8.5 अब्ज आणि 2050 पर्यंत 9.7 अब्जाचा आकडा पार करू शकेल. संयुक्त राष्ट्रांमधील पॉप्युलेशन डिव्हिजनचे संचालक जॉन विलमोथ यांनी सांगितले की 2080 मध्ये लोकसंख्या आपल्या कळसाला जाऊन पोहोचेल व त्यावेळी ती 10.4 अब्ज असेल.

Back to top button