चंद्रावर दीर्घकाळ झाला होता उल्कापिंडांचा वर्षाव | पुढारी

चंद्रावर दीर्घकाळ झाला होता उल्कापिंडांचा वर्षाव

न्यूयॉर्क : खगोलीय अभ्यासासाठी चंद्रही अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. चंद्राची अनेक वैशिट्ये पाहून आजही खगोलशास्त्रज्ञ चकित होतात. पृथ्वी व सूर्यमालेच्या निर्मितीचा विचार करताना चंद्राला समजून घेणेही तितकेच आवश्यक आणि महत्त्वाचे ठरते. किंबहुना चंद्राशिवाय सूर्यमालेचा अभ्यास पूर्ण होऊच शकत नाही.

चंद्राच्या जमिनीचे अवलोकन केल्यास अनेक महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत मिळतात. यापैकी एक म्हणजे चंद्राच्या जमिनीवर असंख्य विवरे, खड्डे आहेत. याचा जर विचार केल्यास चंद्रावर दीर्घकाळापर्यंत उल्कापिंड आणि लघुग्रहांचा वर्षाव झाला असावा, असे संकेत मिळतात. यातूनच चंद्राच्या जमिनीच्या वरच्या थराबाबत भरपूर माहिती मिळू शकते.
दरम्यान, असेही मानले जाते की, सुमारे 3.8 अब्ज वर्षांपूर्वी चंद्रावर लघुग्रह आणि उल्कापिंडांचा वर्षावर होत होता. ही खगोलीय प्रक्रिया दीर्घकाळापर्यंत सुरू होती. यामुळेच चंद्रावर क्रेटर (विवरे), खोल दर्‍या, मोठ्या भेगा असलेल्या कवचाची (पहिला थर) निर्मिती झाली असावी.

‘एमआयटी’च्या संशोधकांच्या मते, चंद्राच्या जमिनीच्या वरच्या थराचा अभ्यास केल्यास या खगोलीय पिंडाबाबत भरपूर माहिती मिळू शकते. यासंर्भात ‘नेचर जियो सायन्स’मध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनामध्ये ‘सिम्युलेशन’च्या माध्यमातून संशोधकांनी चंद्रावरील घडामोडींबाबत माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला. चंद्रावर उल्कापिंड आणि लघुग्रहांचा प्रचंड प्रमाणात वर्षाव झाल्यानेच आजही तेथे मोठ-मोठी विवरे दिसतात. मात्र, यासंदर्भात अधिक संशोधन झाल्यास सत्य समोर येण्याची शक्यता आहे.

Back to top button