व्यायामाने कसे घटते वजन? | पुढारी

व्यायामाने कसे घटते वजन?

कॅलिफोर्निया : व्यायाम केल्याने शरीराला अनेक प्रकारे फायदा मिळतो. व्यायामामुळे शरीराचे वजन नियंत्रित राहते. मेटाबॉलिजम सुधारते आणि शरीरही तंदुरुस्त बनते. मात्र, व्यायामामुळे हे सर्व काही नेमके कसे घडते? याचे गूढ अमेरिकन शास्त्रज्ञांनी उलगडले. व्यायामादरम्यान शरीरात नेमके कोणते बदल होतात? ज्यामुळे माणसाला त्याचा लाभ मिळतो, याचे निश्‍चित कारण शोधले, असे संशोधकांचे मत आहे.

अमेरिकेतील ‘स्टॅनफोर्ड व बेलर कॉलेज ऑफ मेडिसीन’च्या शास्त्रज्ञांनी सांगितले की, आम्ही रक्‍तातील अशा एका मॉलिक्यूलचा शोध लावला आहे की, त्याची निर्मिती व्यायामामुळे होते. रक्‍ताच्या याच मॉलिक्यूलमुळे माणसाची खाण्याची इच्छा घटते आणि लठ्ठपणा कमी होतो.

‘नेचर’ जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनामध्ये भूक आणि व्यायाम यांच्यातील संबंध समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. संशोधक डॉ. याँग शू यांच्या मते, खासकरून लठ्ठ लोकांनी नियमित व्यायाम केल्यास त्यांचे वजन घटते. याशिवाय त्यांची भूक नियंत्रणात राहते आणि मेटाबॉलिजमही सुधारते.

शास्त्रज्ञांनी हे संशोधन उंदरांवर केले. यादरम्यान प्रथम त्यांनी उंदरांच्या ब्लड प्लाझ्माची तपासणी केली. उंदरांनी व्यायाम करावा, यासाठी खास ट्रेडमिल तयार करून त्यांना धावण्याचे ट्रेनिंगही दिले. यावेळी उंदरांच्या रक्‍तात ज्या मॉलिक्यूलचा शोध लागला, ते अ‍ॅमिनो अ‍ॅसिडचे बदलले रूप होते. त्याला ‘लॅक-फे’ असे नाव देण्यात आले. संशोधकांनी सांगितले की, जो कोणी नियमितपणे व्यायाम करतो, त्यावेळी त्याच्या शरीरात ‘लॅक-फे’ तयार होते. यामुळे वजन घटते, भूक नियंत्रणात राहते आणि मेटाबॉलिजमही सुधारते.

Back to top button