‘नासा’चे रोव्हर मंगळावर शोधणार अमिनो अ‍ॅसिड | पुढारी

‘नासा’चे रोव्हर मंगळावर शोधणार अमिनो अ‍ॅसिड

वॉशिंग्टन : मंगळ ग्रहावर जीवसृष्टी आहे की नाही याबाबत सामान्य माणसांपासून ते संशोधकांपर्यंत सर्वांनाच कुतुहल आहे. सध्या ‘नासा’चे काही रोव्हर मंगळभूमीवर असून ते याबाबतचा शोध घेत आहेत. ‘नासा’ने पाठवलेले पर्सिव्हरन्स रोव्हर आता तेथील जीवसृष्टीबाबतचा पुरावा शोधण्यापासून केवळ 7 फूट अंतरावर आहे. याचा अर्थ हे रोव्हर मंगळभूमीवर जर आणखी सुमारे 7 फूट खोल उत्खनन करू शकले तर त्याला याबाबत यश मिळेल. तिथे हे रोव्हर काही खास अमिनो अ‍ॅसिडचा शोध घेईल जे प्रोटिन निर्माण करण्यासाठीचा व जीवसृष्टीसाठीचा एक महत्त्वाचा घटक आहे.

‘अ‍ॅस्ट्रोबायोलॉजी’ या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीनुसार मंगळावरील अमिनो अ‍ॅसिडचे पुरावे कॉस्मिक किरणांमुळे नष्ट होत आहेत. ‘नासा’च्या गोड्डार्ड स्पेस फ्लाईट सेंटर, मेरीलँडचे अलेक्झांडर पावलोव्ह यांनी सांगितले की सध्या मार्स रोव्हर मिशनने सुमारे 2 इंच उत्खनन केले आहे. मंगळ ग्रहाच्या जमिनीखाली असलेले अमिनो अ‍ॅसिड पूर्णपणे नष्ट होण्यासाठी 2 कोटी वर्षे लागू शकतात. परक्लोरेट अ‍ॅसिड आणि पाणी अमिनो अ‍ॅसिड नष्ट करण्याच्या क्रियेला अधिक गती देतात. 2 कोटी वर्षांचा काळ आपल्याला अधिक वाटला तरी अवकाशीय वर्षांचा विचार करता हा थोडाच काळ आहे.

रोव्हर 6.6 फूट खोलीपर्यंत उत्खनन करू शकले तर त्याला असे अमिनो अ‍ॅसिड मिळू शकते. इतक्या खोलीवरील अमिनो अ‍ॅसिड हे अवकाशातून आलेल्या रेडिएशनमुळे नष्ट झालेले नसेल. अब्जावधी वर्षांपूर्वी मंगळाचे वातावरण दाट होते आणि पृथ्वीप्रमाणेच त्याच्याभोवती चुंबकीय क्षेत्राचे कवच होते. यामुळे तिथे द्रवरूप पाण्याचे अस्तित्व होते.

Back to top button