शाळेजवळ गोंगाट असल्यास स्मरणशक्तीवर परिणाम | पुढारी

शाळेजवळ गोंगाट असल्यास स्मरणशक्तीवर परिणाम

माद्रिद : गोंगाट, ध्वनी प्रदूषण याचा लहान मुलांच्या स्मरणशक्तीवरही परिणाम होत असतो. आता याबाबत स्पेनमध्ये एक नवे संशोधन करण्यात आले आहे. बार्सिलोना इन्स्टिट्यूट फॉर ग्लोबल हेल्थच्या संशोधकांनी बार्सिलोनाच्या 38 शाळांमध्ये शिकणार्‍या मुलांवर हे संशोधन केले. 7 ते 10 या वयोगटातील 2,680 मुलांची पाहणी केल्यावर त्यांनी निष्कर्ष काढला की, गोंगाटामुळे मुलांची स्मरणशक्ती कमजोर होते. स्मरणशक्ती कमी होण्याचे प्रमाण 11.5 टक्के आहे.

गोंगाटामुळे कठीण कामे करण्याच्या क्षमतेतही 23.5 टक्के घट होऊ शकते. त्यामुळे अभ्यासातील एकाग्रताही 4.8 टक्क्यांपर्यंत घटते. जॉडी सनयर यांच्या नेतृत्वाखाली याबाबतचे संशोधन करण्यात आले. त्यांनी सांगितले की, ध्वनी प्रदूषणाचा किशोरावस्थेतील मुलांवर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे शाळा या नेहमी कमी वर्दळ, रहदारी असलेल्या ठिकाणीच उभारल्या जाव्यात. या संशोधनात बाह्य व अंतर्गत ध्वनी प्रदूषणाचे स्वतंत्र परीक्षण करण्यात आले. त्यामध्ये बाह्य भागातून येणार्‍या ध्वनी प्रदूषणाचा परिणाम मुलांच्या क्रीडा कामगिरीवरही दिसून आला. त्यांचे क्रीडा कौशल्यही घटल्याचे दिसले. संशोधन प्रकल्पातील डॉ. मारिया फॉस्टर यांनी सांगितले की, वर्गखोल्यांमधील ध्वनीची पातळी मर्यादेपेक्षा अधिक असल्यास ही बाब न्यूरो डेव्हलपमेंटच्या दृष्टीने धोकादायक असते.

Back to top button