आकाश निरीक्षणासाठी ‘ही’ आहे सर्वोत्तम जागा | पुढारी

आकाश निरीक्षणासाठी ‘ही’ आहे सर्वोत्तम जागा

सिडनी :

अखेर संशोधकांनी आकाश निरीक्षणासाठी पृथ्वीवरील सर्वोत्तम जागा शोधून काढली आहे. ही जागा आहे दक्षिण ध—ुवावर म्हणजेच अंटार्क्टिकावर! ‘डोम ए’ असे या ठिकाणाचे नाव. मध्य अंटार्क्टिकाजवळ समुद्रसपाटीपासून चार किलोमीटर उंचीवर हे ठिकाण आहे. अर्थात अशा दुर्गम ठिकाणी जाऊन आकाश निरीक्षण करण्याचे स्वप्न कोणताही सामान्य माणूस पाहू शकणार नाही!

‘नेचर’ या मासिकात याबाबतच्या संशोधनाची माहिती देण्यात आली आहे. अवकाशातील ग्रह-तार्‍यांचे निरीक्षण करण्यासाठी ‘डोम ए’ ही परिपूर्ण जागा असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. पृथ्वीच्या वातावरणाचा अतिशय कमी अडसर याठिकाणी असतो. त्याठिकाणी अनेक ग्रह-तारे पृथ्वीवरील अन्य ठिकाणांच्या तुलनेत अधिक स्पष्ट दिसतात. ‘अ‍ॅटमॉस्फिरिक टर्ब्युलन्स’ या नावाने ओळखला जाणारा पृथ्वीच्या वातावरणाचा व्यत्यय याठिकाणी येत नाही. ऑस्ट्रेलियातील सिडनीच्या न्यू साऊथ वेल्स युनिव्हर्सिटीतील मायकल अ‍ॅश्‍ले यांनी याबाबतची माहिती दिली. अंटार्क्टिकातील हे उंच ठिकाणी असलेले पठार प्रत्येक दिशेला शेकडो फूट अंतरापर्यंत अगदी सपाट आहे. टेलिस्कोपसाठीही अशी जागा ‘परफेक्ट’ असते. संशोधकांनी तिथे जमिनीपासून 26 फुटांवर एक दुर्बिण बसवली आहे.

Back to top button