दिशाच्या घरापर्यंत पोहोचला कोरोना | पुढारी | पुढारी

दिशाच्या घरापर्यंत पोहोचला कोरोना | पुढारी

मुंबई :

देशाच्या आर्थिक राजधानीत कोरोना महामारीने गरिबांच्या झोपडीपासून ते श्रीमंतांच्या महालांपर्यंत हातपाय पसरवले आहेत. बच्चन कुटुंबीयांपैकी अमिताभ बच्चन, ऐश्‍वर्या राय आणि आराध्या आता कोरोनामुक्‍त झाले असले तरी अभिषेक अजूनही नानावती रुग्णालयात उपचार घेत आहे. अनुपम खेर यांच्या भावाचे कुटुंब व आईही कोरोनाबाधित झाली होती. आता त्यांनी कोरोनावर मात केलेली आहे. अभिनेत्री दिशा पटानीच्या घरातही आता कोरोनाचा शिरकाव झाला आहे. तिचे वडील जगदिश पटानी कोरोना संक्रमित आहेत. अर्थात ते मुंबईत राहत नसून लखनौत असतात. 

उत्तर प्रदेशच्या ऊर्जा विभागातील व्हिजिलन्स यूनिटमधील तीन अधिकारी कोरोना संक्रमित झाले असून त्यामध्ये दिशाच्या वडिलांचा समावेश आहे. एका कार्यालयीन कामासाठी ते लखनौमधून बरेलीला गेले होते. तेथून परतल्यावर त्यांची तपासणी केली असता ते संक्रमित झाल्याचे दिसून आले. जगदिश पटानी हे उत्तर प्रदेशच्या पॉवर डिपार्टमेंटच्या व्हिजिलन्स यूनिटमध्ये डेप्युटी एसपी आहेत. ‘एम.एस. धोनी’ मधून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलेल्या दिशाने पहिल्याच चित्रपटापासून आपला एक चाहतावर्ग बनवलेला आहे. ‘बागी-2’ व ‘भारत’ सारख्या चित्रपटांनी तिच्या चाहत्यांची संख्या वाढवली. दिशा नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. आता तिचे वडील कोरोना संक्रमित झाल्याचे वृत्त ऐकून तिचे चाहतेही चिंतीत आहेत!

Back to top button