प्लास्टिकच्या कचर्‍यापासून पीपीई किट, फेस शिल्ड | पुढारी

प्लास्टिकच्या कचर्‍यापासून पीपीई किट, फेस शिल्ड

नवी दिल्‍ली :

सध्याच्या महामारीच्या काळात कोरोनाविरुद्ध लढत असताना पीपीई किट, फेस शिल्ड यांचा ढालीसारखाच वापर होत असतो. या वस्तू तयार करण्यासाठी सातत्याने नवे नवे आणि पर्यावरणपूरक प्रयत्नही होत आहेत. आता फरिदाबादच्या भव्य चावला या तरुणाने प्लास्टिकच्या बाटल्यांपासून पीपीई किट, फेस शिल्ड, मास्क, टी-शर्ट आणि ग्लोव्हज बनवणे सुरू केले आहे.

कोरोनाचे संकट आणि लॉकडाऊनमुळे अनेक लोक सध्या बेरोजगार झाले आहेत. अशा काळात भव्यने या माध्यमातून सुमारे शंभर लोकांना रोजगारही दिला आहे. त्याचबरोबर पर्यावरणाच्या रक्षणासाठीही मोलाचे योगदान दिले आहे. भव्य चावलाची फॅक्टरी ‘बुल्ट नॅचरल डॉट कॉम’ चे कार्यालय फरिदाबादच्या सेक्टर-11 मध्ये आहे. भव्यला लहानपणापासूनच काही तरी वेगळे करण्याची इच्छा होती. विशेषतः दिल्‍ली-एनसीआरमधील प्रदूषण, पर्यावरणाचा र्‍हास यामुळे तो चिंतीत होता. नैनितालमध्येही एका सुंदर नदीत प्लास्टिकच्या बाटल्यांचा खच पडलेला पाहून त्याची ही चिंता वाढली. त्यानंतर त्याने प्लास्टिकच्या बाटल्यांचे रिसायकलिंग कसे करायचे याबाबतचे शिक्षण घेण्यासाठी अमेरिका गाठली. अमेरिका, यूरोप, जपान व सिंगापूरमध्ये अशा अनेक कंपन्या आहेत ज्या प्लास्टिक बाटल्या रिसायकल करून त्यांच्यापासून कपडे बनवतात. त्यापासून प्रेरणा घेऊन त्याने नोयडा व लुुधियानामध्ये फॅक्टरी सुरू केली. त्याची कंपनी स्पोर्टस् वेअर तयार करते. कचर्‍यातील प्लास्टिक बाटल्यांचा वापर करून त्याची कंपनी टी-शर्टबरोबरच लोअर, रनिंग शॉर्टस्, जॅकेट आणि ट्रॅकसूटसह अन्य सामग्री बनवते. कोरोना काळात त्याने पीपीई किट व फेस शिल्डसारखी उत्पादनेही सुरू केली आहेत. 

Back to top button