ऑस्टियो आर्थरायटिसच्या उपचारात झाले नवे संशोधन | पुढारी

ऑस्टियो आर्थरायटिसच्या उपचारात झाले नवे संशोधन

बंगळूर :

शरीराच्या विभिन्न अवयवांच्या सुरक्षेमध्ये कार्टिलेजची भूमिका महत्त्वाची असते. लवचिक अशा ऊतींची ही संरचना सांध्यांमध्ये लांब हाडांच्या टोकांवर आच्छादन देऊन त्यांचे संरक्षण करते. हे एखाद्या रबरी पॅडिंगसारखेच असते. कार्टिलेज आणि त्यामध्ये असणारी नाजूक हाडे तुटल्याने सांध्यांबाबत होणारा ऑस्टियोआर्थरायटिसवरील उपचार आव्हानात्मक असतो. आता यावरील उपचारासाठी येथील ‘आयआयएससी’ने एक मायक्रोपार्टिकल फॉर्म्युलेशन तयार केले आहे. ते जुन्या ऑस्टियोआर्थरायटिसच्या उपचारासाठी वापरण्यात येणार्‍या औषधांचा प्रवाह निरंतर सुरू ठेवण्यासाठी सहाय्यक होऊ शकते.

संशोधकांनी एक विशिष्ट पॉलिमर मॅट्रिक्स डिझाईन केले आहे. ते पॉली (लॅक्टिक-कोग्याकोलिक अ‍ॅसिड) पीएलजीए नावाच्या जैविक सामग्रीने बनवलेले आहे. याबाबत उंदरांवर काही प्रयोग करण्यात आले. या सुरुवातीच्या चाचण्यांमध्ये पॉलिमर मॅट्रिक्सचे चांगले परिणाम दिसून आले आहेत. औषधाच्या सततच्या प्रवाहामुळे सूज कमी होणे व कार्टिलेजची डागडुजी होणे या गोष्टी दिसून आल्या. ड्रग डिलिव्हरीमध्ये मोठ्या प्रमाणात ‘पीएलजीए’चा वापर केला जातो. अवयव प्रत्यारोपणावेळी नवा अवयव शरीराकडून स्वीकारला न जाण्याची शक्यता असते. त्यावर उपाय म्हणून रॅपामायसिनचा वापर रोगप्रतिकारक प्रणालीला नियंत्रित करण्यासाठी होतो. पेशींचा र्‍हास व कार्टिलेजची हानी रोखण्यासाठी ऑस्टियोआर्थरायटिसवरील उपचारातही ते प्रभावी ठरते. अर्थात, कमी वेळेतच म्हणजे सुमारे एक ते चार तासांत औषधाचा प्रभाव कमी होऊ लागतो. त्यामुळे वारंवार इंजेक्शन द्यावे लागतात. ही समस्या दूर करण्यासाठी पीएलजीए आणि रॅपामायसिनला संयुक्तपणे वापरण्यात आले. त्यामुळे औषधाचा प्रवाह निरंतर सुरू ठेवून रुग्णांना वारंवार होणार्‍या त्रासापासून वाचवता येते. त्यासाठी रॅपामायसिनला पीएलजीए मायक्रो पार्टिकल्समध्ये कॅप्सूलबद्ध करण्यात आले आहे.

Back to top button