अंतराळात उंदरांना पाठवून केले निरीक्षण | पुढारी

अंतराळात उंदरांना पाठवून केले निरीक्षण

न्यूयॉर्क :

काही महिन्यांपूर्वी संशोधकांनी उंदरांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पाठवले होते. अंतराळात राहत असताना या उंदरांची हाडे व स्नायू यांच्यावर कोणता परिणाम होतो हे तपासून पाहण्यासाठी हा प्रयोग करण्यात आला. आता त्याचे निष्कर्ष समोर आले आहेत.

अंतराळवीर दीर्घकाळ अंतराळ माहिमेत असतील तर त्यांची हाडे व स्नायू यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी काय करता येईल हे पाहण्यासाठीही हा प्रयोग होता. भविष्यात मानवाला मंगळावरही पाठवण्याची योजना आहे. अशा दीर्घकालीन अंतराळ मोहिमांमधील दुष्परिणामही तपासून पाहिले जात आहेत. केवळ अंतराळवीरांसाठीच नव्हे तर व्हीलचेअरवरील तसेच बिछान्याला खिळून असलेल्या रुग्णांसाठीही याबाबतचे प्रयोग लाभदायक ठरू शकतात. कनेक्टिकटच्या जॅक्सन लॅबोरेटरीच्या रिसर्च टीमने जिन ली यांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन केले. त्यासाठी 40 मादी उंदरांना गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये स्पेसएक्सच्या रॉकेटच्या सहाय्याने अंतराळात पाठवण्यात आले होते. अंतराळ स्थानकातील तीन अंतराळवीरांनी या उंदरांची काळजी घेतली, त्यांच्या शरीराचे स्कॅनिंग केले व इंजेक्शन्स दिले. ‘प्रोसिडिंग्स ऑफ द नॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेज’मध्ये याबाबतच्या संशोधनाची माहिती देण्यात आली आहे. 24 उंदरांना नियमितपणे कोणतेही औषध दिले गेले नाही. गुरुत्वाकर्षण हीनतेच्या स्थितीत त्यांचे स्नायू व बोन मासमध्ये अपेक्षेप्रमाणे सुमारे 18 टक्क्यांची घट आली. वैज्ञानिकांनी जेनेटिकली मॉडिफाईड आठ उंदरांनाही पाठवले होते. या ‘शक्‍तिशाली’ उंदरांचे वजन घटले नाही उलट वाढले!

Back to top button