तापसी झळकणार शाहरूखबरोबर! | पुढारी | पुढारी

तापसी झळकणार शाहरूखबरोबर! | पुढारी

मुंबई : तापसी पन्नू आता शाहरूख खानबरोबर झळकणार आहे. राजकुमार हिरानी यांच्या आगामी चित्रपटात ही जोडी दिसून येईल. तापसीने यापूर्वी शाहरूख खानच्या बॅनरचा ‘बदला’ हा चित्रपट केला होता. त्यामधील तिचा अभिनय शाहरूखला आवडल्याने आता या बॅनरच्या पुढील चित्रपटातही तिला संधी देण्यात आली आहे.

शाहरूख आणि राजकुमार हिरानी गेली नऊ-दहा महिने या चित्रपटाच्या पूर्वतयारीवर मेहनत घेत होते. आता नोव्हेंबरपासून या चित्रपटाचे शूटिंग सुरू होईल. तत्पूर्वी, ऑक्टोबरमध्ये शाहरूख दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील एटलीबरोबर त्याच्या ‘सनकी’ या चित्रपटाच्या प्री-प्रॉडक्शनवर काम करील. शाहरूखच्या ‘रेड चिलीज’च्या स्टाफने याची पुष्टी केली आहे. लॉकडाऊननंतर अक्षयकुमार, आमीर खान, करिना कपूर खान आदी अनेक कलाकारांनी काम सुरू केले आहे. या यादीत आता तापसी आणि शाहरूखचेही नाव समाविष्ट होत आहे. शाहरूख या महिन्याच्या अखेरीस दिवंगत निर्माते-दिग्दर्शक यश चोप्रा यांच्या जन्मदिनावेळी सिद्धार्थ आनंदबरोबरच्या त्याच्या चित्रपटाचीही घोषणा करणार आहे. तापसी आणि शाहरूखचा आगामी चित्रपट पंजाबमधून परदेशात गेलेल्या लोकांच्या कथेवर आधारित आहे. त्यामुळे कॅनडात या चित्रपटाचे बरेचसे शूटिंग होईल. त्यावेळी कोरोनाबाबत सर्व प्रकारची खबरदारी घेतली जाणार आहे.

Back to top button