डेंग्यूमुळे मिळालेली रोगप्रतिकारक क्षमता कोरोना विषाणूवरही प्रभावी | पुढारी

डेंग्यूमुळे मिळालेली रोगप्रतिकारक क्षमता कोरोना विषाणूवरही प्रभावी

रिओ डी जनैरो : ब्राझीलमध्ये कोरोना विषाणूवर एक नवे संशोधन झाले आहे. त्यामध्ये असे आढळले आहे की डेंग्यूच्या तापामुळे कोरोनाच्या रुग्णांसाठी एक सुरक्षा कवच निर्माण होते. डेंग्यूच्या तापानंतर रुग्णांमध्ये काही काळ अशा अँटिबॉडी विकसित होतात ज्या कोरोनाशी लढण्यासाठीही उपयुक्‍त ठरतात. त्यामुळे अशा रुग्णांमध्ये संक्रमणाची उदाहरणे कमीच दिसतात.

ड्यूक युनिव्हर्सिटीतील प्रा. मिगुइल निकोलेसिस यांनी याबाबतचे संशोधन केले. त्यांनी सांगितले, डेंग्यूचा सामना करण्यासाठी दिल्या जाणार्‍या लसी कोरोनावरही प्रभावी ठरू शकतात. ज्या देशांमध्ये यावर्षी किंवा गेल्यावर्षी डेंग्यूचे अधिक रुग्ण दिसून आले होते, अशा देशांमध्ये कोरोनाचा फैलाव कमी दिसून आला. या रिसर्च रिपोर्टनुसार डेंग्यू आणि कोरोना व्हायरस यांच्यामध्ये एक अनोखा संबंध आहे. हा संबंध लॅटिन अमेरिका, आशिया आणि प्रशांत महासागरातील देशांमध्येही आढळला. या पाहणीत असेही दिसून आले की ज्या लोकांच्या शरीरात डेंग्यूच्या अँटिबॉडी आहेत त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह येते; पण ते आजारी पडलेले दिसत नाहीत. डेंग्यू आणि ‘कोव्हिड-19’चे विषाणू वेगवेगळ्या कुळातील असले तरीही त्यांच्यामध्ये याबाबतीत साम्य दिसून आले.

Back to top button