गर्भवती पत्नीने शार्कच्या जबड्यातून पतीला काढले बाहेर! | पुढारी

गर्भवती पत्नीने शार्कच्या जबड्यातून पतीला काढले बाहेर!

न्यूयॉर्क ः

मृत्यूच्या जबड्यातून पतीला सोडवून आणणार्‍या सावित्रीची कथा आपल्याकडे प्रसिद्ध आहे. जगभरात अशा अनेक महिला पाहायला मिळत असतात. अमेरिकेत फ्लोरिडामध्ये एका गर्भवती महिलेने शार्कच्या जबड्यात अडकलेल्या पतीसाठी पाण्यात उडी ठोकली!

तीस वर्षांचा अँड्र्यू चार्ल्स एडी आपल्या कुटुंबासह खासगी बोटीतून फिरण्यासाठी गेला होता. ते सॉम्ब—ेरो की लाईटहाऊसजवळ स्नॉर्केलिंग करीत असताना अचानक तीन मीटर लांबीच्या बुल शार्कने अँड्र्यूवर हल्‍ला केला.

पाण्यात त्याचे रक्‍त मिसळलेले पाहून त्याची गर्भवती पत्नी मार्गारेटला धक्‍काच बसला. पतीचे प्राण वाचवण्यासाठी तिने कोणताही विचार न करता पाण्यात उडी मारली आणि शार्कच्या जबड्यातून पतीला सोडवले. त्यानंतर त्याला तातडीने एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. बुल शार्क हे प्राणघातक हल्ल्यांसाठी कुख्यात आहेत. अशाच एका माशाने अँड्र्यूवर हल्‍ला केला होता; पण मार्गारेटचे प्रसंगावधान व असामान्य धाडस यामुळे त्याचे प्राण वाचले.

 

Back to top button