ड्रोनच्या मदतीने मिळेल ज्वालामुखीची माहिती | पुढारी

ड्रोनच्या मदतीने मिळेल ज्वालामुखीची माहिती

वॉशिंग्टन : पृथ्वीवर सध्या तब्बल 300 हून अधिक जागृत ज्वालामुखी आहेत. यामुळे त्यांच्यावर नजर ठेवणे अत्यंत अवघड काम आहे. याशिवाय हे ज्वालामुखी कधी जागृत होतील, याचा अंदाज बांधणेही अत्यंत अवघड असते. जेणेकरून लोकांना सावधानतेचा इशारा देता येईल. मात्र, आता असा एक खास ड्रोन तयार करण्यात आला असून त्याच्या मदतीने ज्वालामुखीसंदर्भातील प्रत्येक हालचालीवर नजर ठेवण शक्य होणार आहे.

यासंदर्भात करण्यात आलेल्या अहवालातील माहितीनुसार शास्त्रज्ञांनी एक खास प्रकारचा ड्रोन विकसित केला आहे. आता याचा वापर पापुआ न्यू गिनीमधील सक्रिय ज्वालामुखीबाबतची आकडेवारी जमा करण्यास मदत मिळणार आहे. हेच ड्रोन स्थानिक लोकांना ज्वालामुखीवर नजर ठेवण्यास मदत करतील. या ड्रोनच्या मदतीने ज्वालामुखी नेमके कधी सक्रिय होतील, याबद्दलची माहिती देतील. याशिवाय यामुळे ज्वालामुखीतून बाहेर पडणार्‍या विविध वायूंबद्दलही माहिती मिळेल.

शास्त्रज्ञांनी तयार केलेल्या या ड्रोनच्या मदतीने पृथ्वीवर आणखी किती सक्रिय ज्वालामुखी आहेत? तसेच हे ज्वालामुखी पृथ्वीच्या कार्बनिक चक्रात कोणती भूमिका पार पाडत आहेत? याबद्दलही माहिती मिळविणे सोपे जाणार आहे. सध्या असे ड्रोन पापुआ न्यू गिनीमधील मनास मोटू या अतिसक्रिय ज्वालामुखीनजीक तैनात करण्यात आले आहेत.

 

Back to top button