भरतपूरमध्ये मोठ्या संख्येने आले सैबेरियन पक्षी | पुढारी

भरतपूरमध्ये मोठ्या संख्येने आले सैबेरियन पक्षी

जयपूर : राजस्थानच्या भरतपूरमधील केवलादेव राष्ट्रीय पक्षी अभयारण्यात यावर्षी मोठ्या संख्येने सैबेरियन स्थलांतरित पक्षी आले आहेत. हिवाळ्यात रशियाच्या सैबेरिया प्रांतात हाडे गोठवणारी थंडी असते. तेथील सरासरी तापमान उणे वीस अंश सेल्सिअस असते. अशा थंडीपासून दूर राहण्यासाठी हे पक्षी सुमारे 7 हजार किलोमीटरचा प्रवास करून भारतात येत असतात.

सध्या याठिकाणी असे पाचशेपेक्षा अधिक पक्षी आलेले आहेत. त्यामध्ये पिन टेल, शॉब्लर, वर्ड ऑफ प्रे यासारख्या पक्ष्यांचा समावेश आहे. येथील ऐंचा नावाचे गवत या पक्ष्यांना पसंत असते. तसेच आजुबाजूच्या शेतांमधील गहू व अन्य धान्येही त्यांचा आवडता आहार असतात. हायड्रोला, स्पायरी डोला, अजोला यासारख्या वनस्पतीही त्यांना आवडतात. येथील ऊबदार वातावरण आणि मुबलक खाद्य यामुळे दरवर्षी सैबेरियातून असे पक्षी याठिकाणी स्थलांतर करून येतात. देशातील प्रमुख पक्षी अभयारण्यांमध्ये केवलादेव हे प्रमुख आहे. याठिकाणी हिवाळ्यामध्ये देश-विदेशातून अनेक पर्यटक व पक्षीप्रेमी येतात. यावर्षी कोरोना महामारीमुळे पर्यटक आलेले नाहीत.

Back to top button