लंडनमध्ये ५.७ किलो वजनाच्या बाळाचा जन्म | पुढारी

लंडनमध्ये ५.७ किलो वजनाच्या बाळाचा जन्म

लंडन ः येथे 28 वर्षांच्या एमी स्मिथ या महिलेने 5.7 किलो वजनाच्या बाळाला जन्म दिला आहे. या बाळाची लांबी दोन फूट आहे. एखाद्या सामान्य बाळाचे वजन सहसा 4.2 किलो असते. त्यापेक्षा अधिक वजन असलेले बाळ ‘अधिक वजना’च्या श्रेणीत येते. बकिंघमशायरमध्ये जन्मलेल्या या बाळाचे वजन इतके होते की हॉस्पिटलमध्ये वजनकाट्यावरही त्याचे वजन घेता आले नाही! या बाळाचे नाव जेक असे ठेवले आहे.

जेकचे वजन अन्य बाळांच्या तुलनेत दुप्पटीने अधिक आहे. त्यामुळे त्याचा जन्म सिझेरियन पद्धतीने झाला. जन्मतःच तो इतका वजनदार होता की त्याला दोघांनी उचलून धरले. एमीची दोन वर्षांची कन्या आहे. आता जेकच्या जन्मानंतर व त्याच्या अनोख्या वैशिष्ट्यामुळे ती खूश आहे. दुसरे अपत्य वजनदार असणार हे आधीच तिला ठाऊक होते. तसे स्कॅन रिपोर्टमधून स्पष्ट झाले होते. मात्र, ते इतके वजनदार असेल याचा कुणीही अंदाज केला नव्हता. स्कॅन रिपोर्ट पाहिल्यावर एमीने तीन महिन्यांच्या बाळाच्या आकाराचे कपडे मागवून घेतले होते. मात्र, आता त्याला सहा महिन्यांच्या बाळाचे कपडे बसत आहेत! एमीच्या कन्येचे वजन जन्मतः चार किलो होते. तिची लांबीही जन्मतः अधिक होती.

Back to top button