समुद्रातील खडकावर अनोखे मंदिर | पुढारी | पुढारी

समुद्रातील खडकावर अनोखे मंदिर | पुढारी

जकार्ता : जगभरात काही अनोखी मंदिरे पाहायला मिळत असतात. इंडोनेशियाच्या बाली बेटावर मूळ इंडोनेशियन हिंदूंची अनेक सुंदर मंदिरे आहेत. तिथेच समुद्रतटाजवळील एका खडकावर असलेले मंदिर अतिशय अनोखे आहे. या मंदिराचे नाव आहे ‘तनाह लोत’ मंदिर.

‘तनाह लोत’चा अर्थ ‘सागरी भूमी’. समुद्र तटावर एका श्रृंखलेच्या रूपात अशी सात मंदिरे बनवलेली आहेत. या मंदिरांची खासियत अशी की एका मंदिरातून दुसरे मंदिर स्पष्टपणे दिसते. ‘तनाह लोत’ हे मंदिर ज्या खडकावर उभे आहे तो हजारो वर्षे भरती-ओहोटी सहन करीत आला आहे. 1980 मध्ये मात्र तो कमजोर झाल्याचे आढळून आल्यानंतर या मंदिराजवळ जाणे धोकादायक असल्याचे जाहीर करण्यात आले. मात्र, अद्यापही हे सुंदर आणि अनोखे मंदिर लोकांना आकर्षित करते. पंधराव्या शतकात निरर्थ नावाच्या एका साधू व्यक्‍तीने या मंदिराची उभारणी केली होती. समुद्र किनार्‍यावरून फिरत असताना तो याठिकाणी आला होता व तेथील निसर्गसौंदर्याने त्याला मोहून टाकले. त्याने आजुबाजूच्या मच्छीमारांना आग्रह केला की या खडकावर समुद्रदेवतेचे मंदिर उभे केले जावे. या मंदिरात आता निरर्थचीही पूजा केली जाते.

 

Back to top button