एकेकाळी शार्क जणू लुप्‍तच झाला होता! | पुढारी

एकेकाळी शार्क जणू लुप्‍तच झाला होता!

वॉशिंग्टन : शार्क मासे सुमारे 40 कोटी वर्षांपासून अस्तित्वात आहेत. पृथ्वीच्या इतिहासातील पाच प्रमुख संहाराच्या घटनांमधून त्यांचे अस्तित्व बचावले आहे. मात्र, एकेकाळी म्हणजेच 1 कोटी 90 लाख वर्षांपूर्वी शार्क मासे जवळ जवळ लुप्‍तच झाले होते असे संशोधकांनी म्हटले आहे.

‘सायन्स’ या नियतकालिकात याबाबतच्या संशोधनाची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार एक लाख वर्षांच्या काळात जगभरातील महासागरांमधील शार्क माशांची संख्या 90 टक्क्यांनी घटली होती. शार्कच्या प्रजातींची संख्याही किमान 70 टक्क्यांनी घटली होती. पॅसिफिक म्हणजेच प्रशांत महासागरातील दोन अतिशय खोल ठिकाणी सापडलेल्या शार्कच्या जीवाश्मांचे अध्ययन करून याबाबतचे निष्कर्ष काढण्यात आले आहेत. विशिष्ट काळातील शार्कच्या जीवाश्मांची संख्याही यावेळी पडताळून पाहण्यात आली. ज्या भयावह आपत्तीने 6 कोटी 60 लाख वर्षांपूर्वी डायनासोर आणि 75 टक्के जीवसृष्टी नष्ट झाली होती, त्या आपत्तीपेक्षाही अधिक मोठ्या संकटातून शार्क मासे या काळात जात होते. येल युनिव्हर्सिटीच्या एलिझाबेथ सिबर्ट यांनी याबाबतची माहिती दिली. यामध्ये शार्क पूर्णपणे नष्ट झाले नाहीत तरी त्या संकटातून ते कधीच पूर्णपणे बाहेरही आले नाहीत. सध्या आपण त्या काळापेक्षा वेगळे असलेले शार्क महासागरांमध्ये पाहत आहोत. शार्क माशांवरील या संकटाची माहिती आधी वैज्ञानिकांना नव्हती. हे संकट नेमके कशा स्वरूपाचे होते याबाबत आता संशोधन सुरू आहे.

 

Back to top button