नव्या ‘पिग्मी ब्ल्यू व्हेल’ प्रजातीचा शोध | पुढारी

नव्या ‘पिग्मी ब्ल्यू व्हेल’ प्रजातीचा शोध

कॅनबेरा : समुद्रात तळाशी असलेले अणुबॉम्ब शोधताना शास्त्रज्ञांना एक वेगळाच खजिना हाती लागला. या शास्त्रज्ञांनी हिंद महासागरात ‘पिग्मी ब्ल्यू व्हेल’ माशाच्या नव्या प्रजातीचा शोध लावला आहे. आकारात हा मासा प्रचंड मोठा असला, तरी त्याला आतापर्यंत शोधले जाऊ शकले नव्हते. अ‍ॅटॉमिक बॉम्ब डिटेक्शन ऐरेच्या मदतीने पाण्याखालून मिळालेल्या ‘अ‍ॅक्युस्टिक डेटा’चे विश्लेषण केले असता एक अनोखी धून आढळून आली, जी यापूर्वी कधीच ऐकली गेली नव्हती.

‘पिग्मी ब्ल्यू व्हेल’ या माशाची लांबी सुमारे 24 मीटरपर्यंत असू शकते. ही ब्ल्यू व्हेलची उपप्रजात असल्याचे संशोधकांचे मत आहे. व्हेलची ही प्रजात हिंद महासागरातील ‘शागोस’ असे नाव असलेल्या बेटानजीक आढळून आली आहे. ऑस्ट्रेलियातील ‘युनिव्हर्सिटी ऑफ न्यू साऊथ वेल्स’चे मरिन इकॉलॉजिस्ट ट्रेसी राजर्स यांनी सांगितले की, सध्या या आकाराने मोठ्या असलेल्या या जलचरांचा शोध घेण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. मात्र, समुद्री जीवांचा शोध घेऊन अभ्यास करणे सोपे नसते.

दरम्यान, ‘यूएनएसडब्ल्यू’मध्येच कार्यरत असलेले संशोधक इम्मॅन्युएल लेरॉय यांच्या मते, अथांग महासागरात ब्ल्यू व्हेल माशांना शोधणे फारच अवघड असते. कारण, वाढत्या शिकारीमुळे हे मासे आता लुप्त होण्याच्या उंबरठ्यावर आहेत. दक्षिण गोलार्धात कधीकाळी या माशांची संख्या तब्बल साडेतीन लाख इतकी होती. मात्र, दुर्दैवाने ही संख्या आता जेमतेम 5 ते 10 यादरम्यान आहे. याशिवाय हे मासे एकजुटीने राहत नाहीत. यामुळे त्यांना शोधणे आणखी कठीण बनते. या माशांच्या आवाजाचे पॅटर्न एक वेगळ्याच प्रकारचे असते.

Back to top button