रशियाच्या प्रयोगशाळेतून लीक झाला होता घातक जीवाणू! | पुढारी

रशियाच्या प्रयोगशाळेतून लीक झाला होता घातक जीवाणू!

मॉस्को : चीनच्या वुहान प्रयोगशाळेतूनच सध्या जगभर हाहाकार माजवत असलेला कोरोना विषाणू लीक झाला आहे, असे जगभरातील अनेक तज्ज्ञांचे म्हणणे आहे. चीन याचा इन्कार करीत असला, तरी असे घडणे शक्यच नाही, असे म्हणता येत नाही. 42 वर्षांपूर्वी रशियातील एका प्रयोगशाळेतूनही विषाणू नव्हे; पण एक घातक जीवाणू लीक झाला होता आणि अनेक लोक त्याच्या संसर्गाने आजारी पडले होते. काही दिवसांमध्येच किमान 66 लोकांचा यामुळे मृत्यू झाला होता. या लोकांना कीटकनाशके फवारून दफन करण्यात आले होते.

सन 1979 मध्ये एप्रिल आणि मे महिन्यात अचानक वेगळ्या प्रकारच्या न्युमोनियाच्या रुग्णांची संख्या हॉस्पिटलमध्ये वाढू लागली. त्यावेळी रशियातील गुप्‍तचर पोलिसांनी या रुग्णांचे रेकॉर्डस् जप्‍त केले आणि डॉक्टरांना आपले तोंड बंदच ठेवण्याचा सल्‍ला दिला. अमेरिकन गुप्‍तहेरांना त्यावेळी रशियाच्या एका लॅबमधून काही तरी लीक झाल्याची खबर मिळाली होती. मात्र, त्यावेळी रशियातील स्थानिक प्रशासनाने सध्या चीनमध्ये जे सांगितले जात आहे तसेच उत्तर दिले होते. हा आजार संक्रमित मांसामधून फैलावला असल्याचे त्यावेळी रशियातील स्थानिक प्रशासनाने म्हटले होते. त्यावेळी हवेतून फैलावणारे हे प्राणघातक अँथ्रेक्स संक्रमण तेथील एका लष्करी प्रयोगशाळेतून निर्माण झाले होते. मात्र, त्यावेळी अमेरिकन संशोधकांनी सोव्हिएत संघाच्या दाव्याचे समर्थन करून म्हटले होते की, हे जीवाणू संक्रमण प्राण्यांमधून माणसात आले आहे. 1990 मध्ये सुरू केलेल्या तपासणीच्या निष्कर्षावरून स्पष्ट झाले की, रशियाच्या येकटरिंगबर्ग शहरातील लॅबमधून हे संक्रमण फैलावले होते. सध्या त्यावेळेच्या बळींची ओळख लपवण्यासाठी त्यांची थडगी वेगवेगळी करून त्यावरील त्यांच्या नावाच्या पट्ट्याही हटवण्यात आल्या आहेत. जैविकशास्त्राचे तज्ज्ञ मेसलसन यांनी म्हटले आहे की, 1992 मध्ये सोव्हिएत संघाच्या विघटनानंतर ते आणि त्यांची पत्नी, मेडिकल अँथ्राेपोलॉजिस्ट जेनी गुलियन हे येकटरिंगबर्ग शहरात गेले होते आणि त्यांनी अन्य अमेरिकन तज्ज्ञांसह या घटनेचे अध्ययन केले होते. 2 एप्रिल 1979 मध्ये ईशान्य वार्‍यांमुळे काही मिलिग्रॅम अँथ्रेक्स हवेतून फैलावला होता, हे त्यावेळी स्पष्ट झाले. प्रयोगशाळेच्या बाहेर किमान तीस मैलांपर्यंत त्याचा फैलाव झाला होता.

Back to top button