कोटाच्या बाहीवर तीन बटणं का असतात?, जाणून घ्या कारण | पुढारी

कोटाच्या बाहीवर तीन बटणं का असतात?, जाणून घ्या कारण

लंडन : जगभरातील अनेक लोक कोणत्याही खासप्रसंगी सूट घालत असतात. ऑफिसमधील मिटिंग्जपासून लग्न आणि पार्ट्यांपर्यंत अनेक ठिकाणी असा पोशाख घातला जातो. या सूटमध्ये एक गोष्ट ‘कॉमन’ असते. ती म्हणजे त्या सूटमधील कोटाच्या बाहीवर तीन बटणं असतात. अशी तीन बटणं का ठेवली जातात याचे कारण अनेकांना माहिती नसेल.

कोटाच्या स्लीव्हवरील तीन बटणांमागे दोन कथा सांगितल्या जातात. पहिली लष्कराशी संबंधित आहे. त्यानुसार बि—टनची राणी एलिझाबेथ पहिली आणि थोड्या आधुनिक काळात नेपोलियनसारख्या राजेशाही व्यक्तींनी पहिल्यांदा लष्करासाठी ब्लेझर्स वापरण्याची पद्धत सुरू केली. कोटाच्या बाहीवर तीन बटणं लावल्याने सैनिक नाक, तोंड पुसण्यासाठी बाहीचा वापर करणार नाहीत असा त्यावेळी समज होता.

घाणेरड्या बाह्यांमुळे त्यांचे आरोग्य बिघडेल आणि ‘इम्प्रेशन’ही खराब होईल असे त्यावेळेच्या लोकांना वाटत असे म्हणे. आपल्या गणवेशाचा सैनिकांनी आदर करावा यासाठी बाहीवर तीन बटणं लावण्याची पद्धत सुरू झाली असे म्हटले जाते. अर्थात यामध्ये किती तथ्य आहे हे कुणालाही ठामपणे सांगता येत नाही. दुसर्‍या कथेनुसार असा कोट रोजच परिधान करणारे लोक पूर्वी होते. जर कोटाची बाही घट्ट असेल तर एखाद्याला जड कामे करण्यासाठी तो काढावा लागायचा.

कोट काढणं त्या काळात असभ्य मानले जाई. त्यामुळे स्लिव्हची तिन्ही बटणं उघडल्याने कोट परिधान करूनही काम करणे सोपे झाले. त्यावेळी कोटाच्या स्लिव्हमधील अशी तीन बटणं केवळ दाखवण्यासाठीच होती असे नाही तर ती उघडताही येत असत.

Back to top button