रिकाम्या पोटी का वाढते रक्तातील साखर? | पुढारी

रिकाम्या पोटी का वाढते रक्तातील साखर?

नवी दिल्ली :  सध्याच्या बदललेल्या जीवनशैलीमुळे लोकांना अनेक आजारांचा सामना करावा लागत आहे. त्यापैकीच एक आहे मधुमेह. भारत तर आता ‘मधुमेहाची राजधानी’ बनत चालला आहे. मधुमेहामुळे अन्यही अनेक आजारांना आयतेच आवतण मिळत असते. त्यामध्ये हृदयविकार, मूत्रपिंड, डोळे, मेंदू आणि त्वचेच्या विकाराचा समावेश आहे. यापासून बचाव करण्यासाठी रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणे गरजेचे असते.

सर्वसाधारणपणे गोड किंवा आरोग्यास अपायकारक पदार्थ खाल्ल्याने ब्लड शुगर वाढते. मात्र, अनेकवेळा असेही दिसून येते की सकाळी रिकाम्या पोटी असतानाही रक्तातील साखर वाढते. असे का घडते याची अनेकांना कल्पना असत नाही.

तज्ज्ञांच्या मतानुसार हार्मोन्समधील बदलांमुळे सकाळी पोट रिकामे असतानाही रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू शकते. रात्री झोपेवेळी हार्मोन्सना नियंत्रित करण्यासाठी शरीरात अधिक प्रमाणात इन्शुलिनची निर्मिती होते. रात्रीच्या खाण्यामध्ये कार्बोहायड्रेटस्चे प्रमाण अधिक असेल तर सकाळी ब्लड शुगर लेव्हल वाढू शकते. जर आपण मधुमेहाचे रुग्ण असाल तर औषधे वेळेवर घेतली आहेत की नाही याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

तसे झाले नाही तर सकाळी रक्तातील साखर वाढू शकते. जर आपण झोपण्यापूर्वी इन्शुलिन घेतले असेल आणि सकाळी रक्तातील साखर वाढली असेल तर या स्थितीला ‘रिबाऊंड हायपरग्लेसेमिया’ असे म्हटले जाते. जर सकाळी रिकामे पोट असताना रक्तातील साखरचे प्रमाण 70-100 एमजी/डीएल असेल तर काळजीची बाब नाही. जर हा स्तर 100-125 एमजी/डीएल झाला ती ‘बॉर्डर लाईन’ आहे. यापेक्षा अधिक साखर असणे हे मधुमेहाच्या स्तरात येते.

Back to top button