प्रकाशाविना सागरी जीव तयार करतो ऑक्सिजन | पुढारी

प्रकाशाविना सागरी जीव तयार करतो ऑक्सिजन

बर्लिन : पृथ्वीवरील जीवनासाठी ऑक्सिजन अत्यंत महत्त्वाचा आहे. हा वायू तयार करण्यासाठी आवश्यक असतो सूर्यप्रकाश. मात्र, पृथ्वीवरीलच एखाद्या जीवाने सूर्यप्रकाशाच्या मदतीविना ऑक्सिजनची निर्मिती केली तर? हे अशक्य वाटत असले, तरी ते खोल समुद्रात शक्य आहे.

खोल समुद्रात अब्जावधींच्या संख्येने सूक्ष्म जीव सूर्यप्रकाशाविना ऑक्सिजनची निर्मिती करतात. हा असा शोध आहे की, भविष्यात सूर्यप्रकाशाविना ऑक्सिजनची निर्मिती करण्यास प्रेरणा देणारा आहे. ‘युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न डेन्मार्क’चे मायक्रोबायोलॉजिस्ट बीट क्राफ्ट यांनी यासंदर्भात सांगितले की, ऑक्सिजनविना जिवंत राहण्याची क्षमता सूक्ष्म जीवांमध्ये असते, याची कल्पना होती. मात्र, पहिल्यांदाच असे माहीत झाले की, ‘नायट्रोसोपमिलस मॅरिटिमस’ हा सूक्ष्म जीव एका खास प्रकारच्या जैविक प्रक्रियेच्या मदतीने ऑक्सिजन तयार करतो. तेसुद्धा सूर्यप्रकाशाविना. हा एक आश्चर्य वाटणारा, पण भविष्यात सूर्यप्रकाशाविना ऑक्सिजनची निर्मिती करण्यास प्रेरणा देणारा शोध आहे. यामुळे हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण शोध असल्याचे मानले जात आहे.

बिट क्राफ्ट यांनी सांगितले की, खोल समुद्रात नायट्रोसोपमिलस मॅरिटिमस आणि त्याचे संबंधी मोठ्या संख्येने आढळून येतात. खोल समुद्रात सूर्याची किरणे पोहोचत नाहीत. यामुळे तेथे गडद अंधार असतो. तरीही हे जीव सूर्यप्रकाशाविना तेथे ऑक्सिजन तयार करून जिवंत राहतात.

बिट यांनी पुढे सांगितले की, जर तुम्ही खोल समुद्रातील बादलीभर पाणी घेतल्यास त्यामध्ये असलेल्या प्रत्येक पाचपैकी एक जीव नायट्रोसोपमिलस मॅरिटिमस असतील. इतक्या मोठ्या प्रमाणात ते अस्तित्वात आहेत.

Back to top button