औरंगाबाद जिल्हा परिषद सदस्य संख्या वाढवण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता | पुढारी

औरंगाबाद जिल्हा परिषद सदस्य संख्या वाढवण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता

औरंगाबाद ; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील जिल्हा परिषदांची सदस्य संख्या वाढवण्यास सोमवारी (दि. २९) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या संदर्भातील विधेयक आगामी विधिमंडळ अधिवेशनात मांडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर औरंगाबाद जिल्हा परिषदेत ८ गट आणि १६ गण वाढतील, असा अंदाज वर्तविला जात आहे.

१९९७-२००२ या पंचवार्षिकमध्ये जिल्ह्यात ५८ गट होते. २००२ मध्ये त्यात दोनने वाढ होवून ती संख्या ६० वर पोहचली होती. सन २०१७ मध्ये २ गट व ४ गण वाढले होते. त्यामुळे जिल्हा परिषद सदस्य संख्या ६० वरून ६२ झाली होती. औरंगाबाद तालुका आणि पैठण तालुक्यात प्रत्येकी एक गट वाढला होता.

सध्या औरंगाबाद जिल्हा परिषद सदस्यांची संख्या ६२ इतकी आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ मधील कलम ९ (१) मध्ये सुधारणा करून जिल्हा परिषद सदस्यांची संख्या वाढविण्याचे प्रस्तावित करण्यात आल्याने औरंगाबाद जिल्हा परिषदेतील सदस्यांची संख्या ६२ वरून ७० इतकी होईल. त्याचप्रमाणे पंचायत समिती सदस्यांची संख्या देखील १२४ वरून १४० इतकी होईल.

राज्यमंत्री सत्तार यांचा पुढाकार

राज्यभरामध्ये मतदारांची संख्या वाढल्यामुळे गट-गणांची संख्या वाढावी, यासाठी जि.प.चे बांधकाम सभापती किशोर बलांडे यांनी निवेदन तयार करून ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना दिले होते. मनपा, नगरपालिकांच्या धर्तीवर जिल्हा परिषदेतही सदस्य संख्या वाढीसाठी सत्तार यांनी मंत्रालयात प्रयत्न केले.

मी पुन्हा येणारचा नारा

जि.प. निवडणुकीपूर्वी गटाचे आरक्षण काढणार असल्याने, विद्यमान सदस्यांपैकी केवळ ५ टक्केच सदस्यांना पुन्हा जिल्हा परिषदेत येण्याचे भाग्य लाभते. आता संख्या वाढीमुळे उतरत्या क्रमाने आरक्षण काढल्या जात असल्याने “मी पुन्हा येणार…”चा नारा अनेक सदस्य देऊ लागले आहेत.

Back to top button