सोलापूर : टायर फुटून अपघातात 5 मृत्यू | पुढारी

सोलापूर : टायर फुटून अपघातात 5 मृत्यू

सोलापूर/उत्तर सोलापूर ; पुढारी वृत्तसेवा : अक्कलकोटहून सोलापूर कडे येणारी वडाप जीप कुंभारीजवळ (ता. अक्कलकोट) टायर फुटून उलटून खड्ड्यात पडल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात अक्कलकोट तालुक्यातील पाच जणांचा मृत्यू, तर सातजण जखमी झाले. मंगळवारी (दि. 16) सकाळी 10.30 च्या सुमारास ही दुर्घटना घडली. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.

लक्ष्मण मुरलीधर शिंदे (वय 50, रा. बनसगोळ), कट्ट्याव्वा यल्लाप्पा बनसोडे (55), बसवराज यल्लप्पा बनसोडे (42), आनंद इरप्पा गायकवाड (25, सर्व रा. ब्यागेहळ्ळी ता. अक्कलकोट) व एक अनोळखी महिला अशी पाच मृतांची नावे आहेत. निसार अमिरोद्दीन पिरजादे (50, रा. बर्‍हाणपूर), अक्षय लक्ष्मण शिंदे (19, रा. बनसगोळ), आनंद युवराज लोणारी (27, रा. ब्यागेहळ्ळी), समर्थ प्रसाद अनंत (20, रा. पालोसिद्ध), विशाल बापू गोडसे (29, रा. समतानगर, अक्कलकोट), गुरूराज राजेंद्र कांबळे (28, रा. बुधवार पेठ, अक्कलकोट), सैफन इब्राहिम वाडेकर (60, रा. गौडगाव), अशी जखमींची नावे आहेत.

याप्रकरणी वळसंग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. अपघातानंतर जीपचालक फरार झाला आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. घटनास्थळी रस्त्यावरच मृतदेह व जखमी रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. अपघाताची माहिती मिळताच पोलिस व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदत व बचावकार्य सुरू केले. जखमींना तत्काळ खासगी तसेच शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. यावेळी मृत व जखमींच्या नातेवाईकांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गर्दी केली होती.

सध्या एस.टी.चा संप सुरू आहे. त्यामुळे खासगी वाहतुकीवर प्रवाशांना भर द्यावा लागत आहे. त्यामुळे जीपसह वडाप करणारी वाहने क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी भरून भरधाव वेगाने धावत आहेत. अशाच पद्धतीने मंळवारी सकाळी अक्कलकोट ते सोलापूर प्रवासी वाहतूक करणारी मॅक्स ही जीप (क्र. एमएच 13 एएक्स 1237) अक्कलकोट येथे प्रवासी भरून सोलापूरकडे भरधाव येत होती.

सुमारे 12 पेक्षा अधिक प्रवासी दाटीवाटीने भरून ही गाडी कुंभारी येथील एका पेट्रोल पंपाच्या जवळ आली. गाडी भरधाव वेगाने सोलापूरकडे निघाली होती. पण अचानक गाडीचे समोरील उजव्या बाजूचे टायर फुटले. अचानक घडलेल्या या प्रकारानंतर चालकाने गाडीवर नियंत्रणाचा प्रयत्न केला. पण तो अपयशी ठरला. अखेर जीप दोन-तीनवेळा उलटून रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात जाऊन पडली. यावेळी गाडीतील प्रवासी इकडेतिकडे फेकले गेले तसेच गाडीचा चक्काचूर झाला.

अपघात इतका भीषण होता की, दोघेजण डोक्यावर आदळून रक्तस्त्राव होऊन जागीच ठार झाले, तर इतर जखमी झाले. घटनेचे वृत्त समजताच वळसंग पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी धावले. त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने मृत व जखमींना सोलापूरच्या शासकीय रूग्णालयात दाखल केले. यावेळी उपचार सुरू असताना तिघांचा मृत्यू झाला. उर्वरित सातजण जखमी असून यातील दोन जखमींना वळसंगच्या खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

दरम्यान, अपघातात चालक मात्र बचावला. अपघातचे भीषण दृश्य आणि अस्ताव्यस्त पडलेले मृतदेह, जखमी पाहून चालकाने तेथून पळ काढला. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस गाडी क्रमांकावरून गाडी मालक व चालकाचा शोध घेत आहेत. अपघाताचे वृत्त समजताच पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, उपअधीक्षक सूर्यकांत पाटील यांनी शासकीय रूग्णालयात येऊन जखमींची विचारपूस केली.

ओळख पटविण्यासाठी पोलिसांची धावाधाव

या अपघातात मृत व जखमींची एकूण संख्या 12 वर होती. त्यातील काही महिला अशिक्षित असल्याने पोलिसांना जखमी तसेच मृतांची ओळख पटविण्यासाठी धावाधाव करावी लागली. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नातेवाईकांची गर्दीही मोठ्या प्रमाणात झाली होती. एका मृत महिलेची सायंकाळी उशिरापर्यंत ओळख पटली नव्हती.

मृत वडील बाजूला; जखमी मुलाला नाही कल्पना

अपघातातील जखमी व मृतांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. काहींना खासगी रुग्णालयातही दाखल केले. शासकीय रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात एका बाजूच्या कोपर्‍यात स्ट्रेचरवर मृतदेह ठेवण्यात आले होते. तेथेच पडदा टाकून जखमींवर उपचार सुरू होते. यावेळी मृत वडील लक्ष्मण शिंदे यांचा मृतदेह बाजूलाच होता. दुसरीकडे जखमी मुलगा अक्षय शिंदे याच्यावर बाहेर उपचार सुरू होते; पण अक्षयला आपल्या वडिलांचा मृत्यू झाला असून त्यांचा मृतदेह शेजारी पडद्याच्या बाजूला असल्याची कल्पना नव्हती.

Back to top button