नाशिक : पावणेदोन लाख कृषिपंपांना जोडण्या | पुढारी

नाशिक : पावणेदोन लाख कृषिपंपांना जोडण्या

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महावितरणने 2022-23 या आर्थिक वर्षात राज्यभरात एक लाख 70 हजार 263 कृषिपंपांना वीजकनेक्शन देत गेल्या 10 वर्षांतील सर्वोत्तम कामगिरी केली आहे. तसेच कृषिपंपांना कनेक्शन देण्यासह प्रलंबित कनेक्शनची संख्या आतापर्यंतची सर्वांत कमी करण्यात महावितरणला यश आले.

ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार महावितरणने कृषिपंपांना प्राधान्याने वीज कनेक्शन देण्यासाठी योजना आखली. या योजनेत गेल्या 10 वर्षांतील सर्वाधिक जोडण्या देत महावितरणने उल्लेखनीय कामगिरी बजावली. यापूर्वी 2019-20 यावर्षी 96 हजार 327, तर 2020-21 या वर्षात एक लाख 17 हजार 304 शेतकर्‍यांना वीजजोडण्या दिल्या होत्या. तसेच 2021-22 या वर्षात एक लाख 45 हजार 867 कृषिपंपांना वीज कनेक्शन देण्यात आली. महावितरणने नुकत्याच संपलेल्या 2022-23 या आर्थिक वर्षात दिलेल्या कृषिपंपांच्या कनेक्शनचे वैशिष्ट्य म्हणजे या वर्षात महावितरणने एकूण एक लाख 70 हजार कनेक्शनपैकी एक लाख 59 हजार कनेक्शन ही पारंपरिक पद्धतीने दिली आहेत. सौरपंप किंवा उच्चदाब वितरण प्रणाली या विशेष योजनांतील केवळ 11000 कनेक्शन आहेत. याआधीच्या वर्षात दिलेल्या एक लाख 45 हजार 867 कृषिपंप कनेक्शनपैकी 46 हजार 175 कनेक्शन ही सौर किंवा उच्चदाब वितरण प्रणालीतील होती. 2022 -23 मध्ये सौर आणि उच्चदाब वितरण प्रणाली योजनांचा फारसा आधार नसताना महावितरणच्या कर्मचार्‍यांनी पारंपरिक पद्धतीने दिलेल्या कनेक्शनची कामगिरी उल्लेखनीय आहे. तर यंदाच्या वर्षी प्रलंबित कृषिपंप वीजजोडण्या जलदगतीने देण्याचे नियोजन महावितरणने केले आहे. दरम्यान शेतकर्‍यांना कनेक्शन देण्यासाठी शासनाने 800 कोटी रुपयांचा निधी दिला. महावितरणने स्वतः 241 कोटींचा निधी खर्च केला. तर शेतकर्‍यांच्या वीजबिल वसुलीतून मिळालेला पैसाही कृषिपंपांना कनेक्शन देण्यासाठी वापरण्यात आल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली.

प्रलंबित कनेक्शनची संख्या लाखांवर
कृषिपंपांच्या प्रलंबित वीज कनेक्शनची संख्या कमी होऊन ती 1 लाख 6 हजार 340 इतकी झाली आहे. ही आतापर्यंतची एका आर्थिक वर्षातील सर्वांत कमी संख्या आहे. याआधी 2019 -20 अखेरीस प्रलंबित कनेक्शनची संख्या एक लाख 67 हजार 383 होती. तर 2020-21 मध्ये एक लाख 84 हजार 613 आणि 2021-22 मध्ये एक लाख 80 हजार 104 आहे.

हेही वाचा:

Back to top button