Women’s T20 World Cup : महिला विश्वचषकात आज भारत-पाकिस्तान आमने-सामने | पुढारी

Women's T20 World Cup : महिला विश्वचषकात आज भारत-पाकिस्तान आमने-सामने

केपटाऊन, वृत्तसंस्था : महिला विश्वचषक टी-20 (Women’s T20 World Cup) क्रिकेट स्पर्धेत आज (दि. 12) भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगणार आहे, पण हा सामना सुरू होण्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. कारण, भारताची उपकर्णधार स्मृती मानधना या सामन्यात खेळणार नसल्याचे आता समोर येत आहे.

पाकिस्तानच्या सामन्यापूर्वी सराव करत असताना स्मृतीच्या हाताला दुखापत झाली होती. ही दुखापत गंभीर स्वरूपाची नव्हती. स्मृतीच्या हाताला फ्रॅक्चर झाले नव्हते, असेही सांगण्यात आले होते, पण स्मृतीची ही दुखापत अजूनही बरी झालेली नाही, असे समजते आहे. त्यामुळे ती आता पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात खेळणार नसल्याचे समोर आले आहे.

भारताच्या महिला संघाचे प्रशिक्षक ऋषिकेश कानिटकर यांनी यावेळी सांगितले की, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी हरमनप्रीत कौर ही पूर्णपणे फिट आहे. या सामन्यापूर्वी स्मृतीच्या बोटाला दुखापत झाली होती. ही दुखापत गंभीर स्वरूपाची नव्हती, पण ती पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात खेळणार नाही. ती या पुढील सामन्यांमध्ये मात्र खेळणार आहे.

दहा संघ दोन गटांत (Women’s T20 World Cup)

या स्पर्धेत सहभागी होणार्‍या 10 संघांची दोन गटांत विभागणी करण्यात आली आहे. गट ‘अ’ मध्ये द. आफ्रिकेसह ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, बांगला देश आणि न्यूझीलंड हे संघ आहेत. तर ‘ब’ गटात भारत, इंग्लंड, आयर्लंड, पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज यांचा समावेश आहे.

भारताचे सामने

हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळणार्‍या टीम इंडियाचा पहिला सामना 12 फेब्रुवारीला केपटाऊनमध्ये पाकिस्तानविरुद्ध आहे. 15 फेब्रुवारीला याच मैदानावर वेस्ट इंडिजशी लढत होईल. तर 18 आणि 20 फेब्रुवारीला पोर्ट एलिझाबेथ येथे अनुक्रमे इंग्लंड आणि आयर्लंड यांच्याशी सामने होतील.

यजमान दक्षिण आफ्रिका सलामीला पराभूत

विश्वचषक टी-20 स्पर्धेचा पहिला सामना यजमान दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यात शुक्रवारी झाला. अत्यंत रोमहर्षक झालेला हा सामना श्रीलंकेने 3 धावांनी जिंकला. त्यांनी प्रथम फलंदाजी करताना 4 बाद 129 धावा केल्या. हे आव्हानही द. आफ्रिकेला पेलले नाही. त्यांचा डाव 9 बाद 126 धावांवर आटोपला.

लाईव्ह प्रसारण

टीम इंडियाचे सर्व सामने भारतीय वेळेनुसार सायंकाळी 6.30 वाजल्यापासून सुरू होतील. सामन्यांचे थेट प्रसारण ओटीटी प्लॅटफॉर्म डिज्ने हॉटस्टार आणि स्टार स्पोर्टस् वाहिनीवरून करण्यात येणार आहे.

हेही वाचा…

Back to top button