पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाला आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने ( आयसीसी) दंड ठोठावला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या नागपूर कसोटीत 'आयसीसी'च्या आदर्श आचार संहितेचे उल्लंघन केल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. 'मॅच फी'च्या २५ टक्के रक्कम जडेजाला दंड म्हणून भरावी लागणार आहे. (IND vs AUS 1st Test)
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात रवींद्र जडेजाने आपल्या फिरकीने ऑस्ट्रेलियन संघाला नाचवले. त्याने ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात ५ विकेट्स पटकावल्या. मात्र, पहिल्या डावातील ४६ व्या षटकात रवींद्र जडेजा बोटाल क्रीम लावताना आढळला. व्हिडिओमध्ये रवींद्र जडेजा मोहम्मद सिराजच्या हातावरून क्रीम घेत आपल्या बोटावर घासताना दिसत आहे. जडेजाने पंचांची परवानगी न घेता ही क्रीम लावली. त्यामुळे आयसीसीने जडेजाविरोधात कारवाईचा बगडा उगारला आहे. (IND vs AUS 1st Test)
या घटनेनंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) या प्रकरणाची माहिती देण्यात आली. (IND vs AUS 1st Test) बीसीसीआयने 'पीटीआय'शी बोलताना सांगितले की, 'बोटांना होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी जडेजाने हा मलम वापरला होता. रवींद्र जडेजानेही आपली चूक मान्य करत 'आयसीसी'ने ठोठावलेला दंड स्वीकारला आहे. त्यामुळे याप्रकरणी सुनावणी घेण्याची गरज पडली नाही.
रवींद्र जडेजाने पहिल्या डावात २२ षटके गोलंदाजी करत ५ विकेट्स पटकावल्या. तर फलंदाजी करताना ९ चौकारांच्या सहाय्याने १८५ चेंडूमध्ये ७० धावांची खेळीही केली. सऱ्या डावातही गोलंदाजी करताना त्याने २ विकेट्स पटकावल्या. (IND vs AUS 1st Test)