Bhandara News : गो तस्करीचे रॅकेट उघड, गौशाळेतून जनावरांची विक्री : संस्थाचालकांसह चार वैद्यकीय अधिका-यांवर गुन्हे दाखल | पुढारी

Bhandara News : गो तस्करीचे रॅकेट उघड, गौशाळेतून जनावरांची विक्री : संस्थाचालकांसह चार वैद्यकीय अधिका-यांवर गुन्हे दाखल

पुढारी ऑनलाइन डेस्क : Bhandara News : जनावरांच्या अवैध वाहतूक प्रकरणी पोलिसांनी जप्त केलेल्या जनावरांची गौशाळेतूनच परस्पर विक्री करणा-या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गौशाळेच्या संचालकांसह चार वैद्यकीय अधिका-यांवर  गुन्हा नोंदविला आहे. या कारवाईमुळे गोतस्करांमध्ये खळबळ उडाली आहे.

Bhandara News : विसर्जन सज्जन चौसरे (रा. गौतम नगर वॉर्ड, पवनी,) विपीन शरद तलमले (रा. पवनी,) मिलींद रामदास बोरकर (रा. पवनी), खुशाल दिलीप मुंडले (रा. बेटाळा) विलास बेदनाथ तिघरे (रा. सिरसाळा), दत्तू शंकर मुनरतीवार (रा. पवनी), लता दौलत मसराम (रा. पवनी), वर्षा लालचंद वैद्य (रा. सिरसाळा), माया विसर्जन चौसरे (रा. पवनी), महेश दौलत मसराम (रा. पवनी), युवराज रविंद्र करकाळे (रा. पवनी), नानाजी मोतीराम पाटील (रा. सिरसाळा), शिवशंकर भाष्कर मेश्राम (रा. पवनी), डॉ. तुळशीदास शहारे (रा. खात रोड भंडारा), डॉ. हेमंतकुमार गभने (रा. अड्याळ), डॉ. दिनेश चव्हाण (रा. पवनी), डॉ. सुधाकर महादेव खुणे (रा. कन्हाळगाव ता. अर्जुनी मोरगाव जि.गोंदिया) अशी आरोपींची नावे आहेत.

Bhandara News : भंडारा जिल्ह्यात जनावरांची तस्करी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अलिकडे पोलिस अधीक्षक लोहित मतानी यांनी जनावरे तस्करांविरुद्ध मोहीम उघडून अनेक कारवाया केल्या. या कारवायांतून जप्त केलेली जनावरे विविध गौशाळेत पाठविण्यात आली. दरम्यान, पवनी तालुक्यातील सिरसाळा येथील बळीराम गौशाळेत जिल्ह्यातील दिघोरी, अड्याळ, वरठी, सिहोरा, पवनी येथे केलेल्या कारवाईत जप्त केलेल्या जनावरांसह चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी येथील १५२ जनावरे ठेवण्यात आली होती. परंतु, गौशाळा संचालकांनी आर्थिक फायद्याकरिता १५२ जनावरांपैकी ८९ जनावरे व भंडारा जिल्ह्यातील इतर जनावरे तस्करांना विकून टाकली. तसेच गौशाळेतील मृत जनावरांबाबत संबंधित पोलिस ठाण्याला माहिती न देता त्यांची परस्पर विल्हेवाट लावून शासनाची फसवणूक केली. यासाठी त्यांचे बनावट मृत्यू प्रमाणपत्र तयार करण्यासाठी पशुवैद्यकीय अधिका-यांनीही मदत केली.

पवनी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता गौशाळेतील तस्करीचा धक्कादायक प्रकार पुढे आला. या प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक आशिष चिलांगे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ४२०, ४६७, ४६८, ४७१, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. तपास पोलिस निरीक्षक गढरी करीत आहेत.

Bhandara News : वैद्यकीय अधिकारी द्यायचे बोगस मृत्यू प्रमाणपत्र

या संपूर्ण रॅकेटमध्ये पशुवैद्यकीय अधिका-यांचाही मोठा सहभाग असल्याचे तपासात दिसून आले आहे. आरोपींमध्ये समावेश असलेले पशुवैद्यकीय अधिकारी मृत जनावरांचे शवविच्छेदन न करता मृत्यूचे बोगस मृत्यू प्रमाणपत्र तयार करुन द्यायचे. त्यासाठी गोशाळा संचालकांकडून आर्थिक फायदा करवून घ्यायचे. पोलिस अधीक्षक लोहित मतानी, अपर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती आणि उपविभागीय पोलिस अधिकारी रिना जनबंधू यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली आहे.

हे ही वाचा :

Virat Kohli T20 Ranking : विराट कोहलीची टी-20 क्रमवारीत मोठी झेप!

Urfi Javed : म्युझिक व्हिडिओतील ड्रेसवरून उर्फी अडचणीत, अश्लीलता पसरवण्याचा आरोप

Back to top button