औरंगाबाद रेल्वे स्थानकाचा चेहरा-मोहरा बदलणार; नुतनीकरणासाठी 180 कोटींचा खर्च | पुढारी

औरंगाबाद रेल्वे स्थानकाचा चेहरा-मोहरा बदलणार; नुतनीकरणासाठी 180 कोटींचा खर्च

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : औरंगाबाद रेल्वे स्थानकाच्या नुतनीकरण कामाची लवकरच सुरूवात होणार आहे. यामध्ये रुफ टॉपसह अत्याधुनिक सोयी सुविधा हाेणार आहेत. यासाठी 180 कोटी रुपयांचा निधी वापरणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केले.

अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या पिटलाईनचे भूमिपूजन केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते सोमवारी(दि.3) पार पडले. यावेळी राज्य रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे, राज्य अर्थमंत्री डॉ. भागवत कराड, सहकार मंत्री अतुल सावे, पालकमंत्री संदिपान भूमरे, खासदार इम्तियाज जलील, विरोधी पक्षनेता अंबादास दानवे, आ. सतिष चव्हाण संजय शिरसाठ, नारायण कुचे व इतर मान्यवर उपस्थित होते.

वैष्णव यांनी कार्यक्रमाची सुरूवात मराठीत करत सर्वांची मने जिंकली. यावेळी त्यांनी मराठवाड्याच्या रेल्वे बाबत अनेक मागण्या आहेत. त्या टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येणार आहेत. यापूर्वी उत्पन्न कमी असल्याने विकास खुंटला होता आता तो नियम लागू नसून सरसकट विकास साधला जाणारआहे. त्यामुळे भविष्यात मराठवाड्यावर अन्याय होणार नाही अशीही ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

200 रेल्वेस्थानकात औरंगाबाद

देशातील 200 रेल्वेस्टेशन अत्याधुनिक बनवण्यात येणार आहेत. यात सर्वच सोयी सुविधा देण्यात येणार आहेत. या 200 स्टेशनसाठी सुमारे 60 हजार कोटींचा निधी वापरण्यात येणार आहे. यात औरंगाबादचा समावेश आहे. सर्वच रेल्वेस्थानकावर रुफ टॉप बनवण्यात येणार आहे. याच धर्तीवर औरंगाबादेतील रेल्वेस्थानकावर तब्बल एक एकरचा रुफ टॉप बनवून त्यावर लहान मुलांच्या खेळण्यासह व्यापाऱ्यांना सुविधा तसेच प्रवाशांना आरामदायी बसण्याची व्यवस्था आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, असेही त्‍यांनी सांगितले.

मालधक्क्याबाबत अहवाल

दरम्यान, रेल्वेस्थानकावर जागा कमी असल्याने येथे 16 बोगीची पिटलाईन बनवण्यात येत आहे. परंतु अनेक रेल्वे संघटनांनी येथे 24 बोगीची पिटलाईन करण्याची मागणी केली. हे करण्यासाठी येथील मालधक्का बाहेर हलवता येईल का या बाबत येत्या दहा दिवसांत अहवाल तयार करण्याचे आदेश दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाला दिले आहेत. मालधक्का हलवल्यास येथे लवकरच 24 बोगीची पिटलाईन करण्याचे संकेत वैष्णव यांनी दिले.

नोव्हेंबरपासून वंदे मातरमचे उत्पादन

वंदे मातरण रेल्वे ही आपल्या तंत्रज्ञानी बनवलेली रेल्वे आहे. या रेल्वेचे उत्पादन लातूर येथील कारखान्यातूनही नोव्हेंबर पासून सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी लागणारे बदल व लागणारे साहित्य टप्प्याटप्प्याने लातूरच्या कारखान्‍यात उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशीही माहिती त्‍यांनी दिली.

हेही वाचा  :

Back to top button