दसरा मेळावा : शिंदे गटाकडून जय्यत तयारी; रेल्वेसह तब्बल 400 बसेसचे बुकींग - आ. कांदे | पुढारी

दसरा मेळावा : शिंदे गटाकडून जय्यत तयारी; रेल्वेसह तब्बल 400 बसेसचे बुकींग - आ. कांदे

मनमाड : पुढारी वृत्तसेवा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून बीकेसी मैदानावर होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली. मेळाव्यासाठी मनमाड, नांदगाव, नाशिक जिल्ह्यातून हजारो कार्यकर्ते जाणार असल्याने त्यांच्यासाठी मनमाड आणि नाशिकरोड येथून एक -एक रेल्वेसोबत तब्बल 400 बसेस बुक करण्यात आल्याची माहिती आमदार सुहास अण्णा कांदे यांनी दिली.

दसरा मेळाव्यात शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर स्व. आनंद दिघे यांच्या विचाराचे सोने लुटण्यासाठी अलोट गर्दी होणार असून येथे महाराष्ट्रातील जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी काय केले जाणार आहे. याबाबत जनसंवाद साधला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बीकेसी मैदानावर तर उद्धव ठाकरे यांचा शिवतीर्थावर दसरा मेळावा होणार आहे. बीकेसी मैदानावर होणाऱ्या मेळाव्यासाठी मनमाड, नांदगाव शहरापाठोपाठ संपूर्ण मतदारसंघ आणि जिल्ह्यात जय्यत तयारी करण्यात आल्याची माहीती आ. कांदे यांनी दिली. मनमाड, नांदगाव शहर आणि मतदार संघातील खेड्यापाड्यातून हजारोच्या संख्येने कार्यकर्ते रवाना होत आहेत. त्यांच्यासाठी सुमारे 150 पेक्षा जास्त एसटी बसेस आणि 2 रेल्वे बुक करण्यात आल्या आहेत. एक रेल्वे गाडी मनमाड रेल्वे स्थानकावरून तर दुसरी नाशिकरोड येथून निघणार आहे. अनेक कार्यकर्ते खाजगी वाहनाने देखील मेळाव्यासाठी जाणार असल्याचे कांदे यांनी सांगितले. एसटी बसेस सोबत सर्वसुविधा असलेल्या दोन एम्ब्युलेंस, डॉक्टर, नर्स आणि औषधोपचार उपलब्ध असणार आहे. कार्यकर्त्यांसोबत मेळाव्यासाठी जाणाऱ्या नागरिकांची काळजी घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. शिवतीर्थापेक्षा बीकेसी ग्राउंड हा दुपटीने मोठा असल्याने हे मैदान शंभर टक्के पूर्ण भरणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. स्व.बाळसाहेब ठाकरे, धर्मवीर स्व.आनंद दिघे यांच्या विचाराचे सोने लुटण्यासाठी प्रचंड गर्दी होणार आहे. शिवतीर्थावर जाणाऱ्यांना खोके, गद्दार, कोथळे असे शब्द ऐकायला मिळेल पण बीकेसी ग्राउंडवर बाळासाहेब साहेब, आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा आणि विचारांचे सोने लुटायला मिळणार आहे. राज्याचा विकास होईल, महाराष्ट्राला प्रगती पथावर नेण्याबाबतचे विचार ऐकायला मिळतील. शेतकरी, तरुण, व्यापारी, विद्यार्थी, महिला यांसह राज्यातील जनतेसाठी सरकार काय करीत आहे? काय करणार आहे याचे नियोतन या मेळाव्यात ऐकायला मिळणार आहे. त्यामुळे बीकेसी ग्राउंडवर न भूतो, न भविष्यती अशी गर्दी होणार असल्याचेही कांदे यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा:

Back to top button