पुणे : मृत व्यक्तीचे 6 तासांमध्ये नेत्रदान आवश्यक, शहरात 10 नेत्रपेढ्या; समन्वय आणि शासनाचा सहभाग आवश्यक | पुढारी

पुणे : मृत व्यक्तीचे 6 तासांमध्ये नेत्रदान आवश्यक, शहरात 10 नेत्रपेढ्या; समन्वय आणि शासनाचा सहभाग आवश्यक

पुणे : शहरात ससून रुग्णालयासह जवळपास 10 नेत्रपेढ्या कार्यरत आहेत. गेल्या काही वर्षांपासून अवयवदानाच्या चळवळीला बळकटी मिळाली आहे. त्या तुलनेत नेत्रदानाची चळवळ मात्र सक्रिय झालेली नाही. नेत्रदानाला बळकटी मिळावी, यासाठी नेत्रपेढ्यांमध्ये समन्वय आणि शासनाचा सहभाग आवश्यक असल्याचे मत अधोरेखित होत आहे. स्वयंसेवी संस्थांकडून नेत्रदानाचे अर्ज भरून घेतले जातात. अर्ज भरणार्‍यांमध्ये बहुतांश वेळा तरुणांचा समावेश असतो. त्यापैकी 1 ते 2 टक्के जणांकडूनच प्रत्यक्षात नेत्रदान केले जाते. नेत्रदानाच्या अर्जदारांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या प्रमाणात समावेश असायला हवा, अशी अपेक्षा पुणे नेत्रदान प्रतिष्ठानचे डॉ. मधुसूदन झंवर यांनी व्यक्त केली. सध्या राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा सुरू आहे. त्यानिमित्ताने नेत्रदानाबद्दल जनजागृती करण्याचे काम विविध पातळ्यांवर हाती घेण्यात आले आहे.

प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाच्या वैद्यकीय कागदपत्रांची फाईल असते. नेत्रदानाचा अर्ज त्यांच्या फाईलला जोडला गेल्यास जनजागृती वाढू शकते आणि डॉक्टरांकडेही नोंद राहू शकते. व्यक्तीच्या मृत्यूपासून 6 तासांच्या आत नेत्रदान होणे आवश्यक असते. मृत व्यक्तीचे डोळे पूर्ण बंद ठेवणे, डोळ्यांवर कापसाचे बोळे ठेवणे, फॅन बंद ठेवणे, डोक्याखालील उशी काढणे आणि नेत्रदानासाठी डॉक्टरांचे प्रमाणपत्र तयार ठेवणे अशी तयारी तातडीने केल्यास नेत्रदान वेळेत करता येऊ शकते. नेत्रदानासाठी नेत्रपेढ्यांशी संपर्क साधता येऊ शकतो.

शहरात दररोज अंदाजे 60 ते 80 लोकांचा मृत्यू होतो. त्यापैकी आठवड्यातून एखाद्या व्यक्तीचे नेत्रदान झाल्याचे दिसून येते. वास्तविक, एक तृतीयांश मृत व्यक्तींचे नेत्रदान होण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी रुग्णालये, नातेवाईक, डॉक्टर, नेत्रपेढ्या यांच्यामध्ये समन्वय निर्माण व्हावा लागेल. अवयवदानासाठी नातेवाइकांचे समुपदेशन केले जाते. हीच प्रक्रिया नेत्रदानाबाबत राबवणे आवश्यक आहे. नेत्रपेढ्या, सामाजिक संस्था आणि नेत्ररोगतज्ज्ञांची एकत्रित संस्था उभी राहणे आवश्यक आहे.
– डॉ. मधुसूदन झंवर, पुणे नेत्रदान प्रतिष्ठान

नेत्रदानासाठी मार्गदर्शक तत्त्वे ठरवून देण्यात आलेली आहेत. डोळे मिळाल्यानंतर त्यांचे 48 तासांच्या आत प्रत्यारोपण होणे आवश्यक असते. भारतातील 30 टक्के नेत्रपेढ्या महाराष्ट्रात कार्यरत आहेत. मात्र, महाराष्ट्रात आणि पर्यायाने पुण्यात नेत्रदानाचे प्रमाण कमी आहेत. सर्व नेत्रपेढ्या चांगले काम करत असल्या तरी त्यांच्यात समन्वय निर्माण झाल्यास चळवळ सक्षम होईल.
– डॉ. संजय पाटील, नेत्ररोगतज्ज्ञ

Back to top button